BJP Congress Alliance : रावेर नगरपरिषदेत आज मोठी राजकीय उलथापालथ? उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजप–काँग्रेस युतीची जोरदार चर्चा

Published : Jan 12, 2026, 02:19 PM IST
 BJP Congress Alliance

सार

BJP Congress Alliance : रावेर नगरपरिषदेतील उपनगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत आहे. भाजप–काँग्रेस युती झाल्यास भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. राजेंद्र चौधरी यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे. 

BJP Congress Alliance : काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये भाजप–काँग्रेस युतीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्या घटनेचे पडसाद अजूनही शांत होत नाहीत, तोच आता जळगाव जिल्ह्यातील रावेर नगरपरिषदेतही अशाच धक्कादायक राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. आज होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष रावेरकडे लागले असून, काँग्रेस ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असल्याने सत्तासमीकरणे कधीही बदलू शकतात.

सत्तेचे गणित आणि काँग्रेसची ‘किंगमेकर’ भूमिका

रावेर नगरपरिषदेत कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. भाजपकडे ९ नगरसेवक असून २ अपक्षांचा पाठिंबा असल्याने एकूण संख्या ११ होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे १० नगरसेवक आहेत. काँग्रेसकडे केवळ २ नगरसेवक असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे १ नगरसेवक आहे. बहुमतासाठी १२ नगरसेवकांची गरज असताना काँग्रेसच्या अवघ्या दोन जागाच सत्तेची चावी ठरू शकतात. त्यामुळे काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

भाजपची रणनीती: काँग्रेसचा पाठिंबा महत्त्वाचा

भाजपकडे सध्या ११ नगरसेवक असल्याने सत्ता स्थापनेसाठी अजून एका नगरसेवकाचा पाठिंबा आवश्यक आहे. काँग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यास भाजपचा आकडा थेट १३ वर जाईल आणि उपनगराध्यक्ष पदाचा मार्ग सुकर होईल. याच पार्श्वभूमीवर भाजप–काँग्रेस युतीच्या चर्चांना वेग आला आहे.

उपनगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र चौधरींचे नाव आघाडीवर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून उपनगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र चौधरी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. काँग्रेसकडून भाजपला पाठिंबा देण्याची तयारी असल्याची चर्चा सुरू असून, तसे घडल्यास रावेरमध्ये एक अनोखा राजकीय प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची डावपेचांची तयारी

दुसरीकडे, १० जागा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही सत्तेसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र, त्यांच्या सत्तेचा मार्गही काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून आहे. काँग्रेस भाजपसोबत जाणार की राष्ट्रवादीला साथ देणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

आज स्पष्ट होणार सत्तेचे चित्र

कट्टर विरोधक असलेले भाजप आणि काँग्रेस सत्तेसाठी एकत्र येतात की राजकीय चित्राला वेगळे वळण मिळते, हे आजच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. रावेरमधील हा निकाल जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरू शकतो.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Pune Municipal Election 2026 : पुणे महापालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस? चार प्रभागांत खर्च १२० कोटींवर जाण्याची चर्चा
Ladki Bahin Yojana: महापालिका निवडणुकीआधी ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे देण्याचा दावा; निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना खुलाशाचे आदेश