
Rajya Sabha Election 2026 : देशातील आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राज्यसभा निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १० राज्यांतील २४ जागांसाठी तसेच दोन रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली असून, महाराष्ट्रातील एका जागेवरील निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आता महायुतीतून कोणाला संधी मिळणार आणि विरोधक कोणता डाव टाकणार याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणूक ही केवळ एक जागा भरण्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर ती आगामी राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारी निवडणूक मानली जात आहे. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागेसाठी महायुतीतील विविध पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होण्याची शक्यता आहे. या सदस्याचा कार्यकाळ ४ जुलै २०२८ पर्यंत असणार असल्याने ही जागा राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरत आहे. महायुतीतील घटक पक्ष आणि विरोधक यांच्यातील राजकीय रणनीती यानिमित्ताने अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांतील राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ जून-जुलै २०२६ मध्ये संपणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधील प्रत्येकी चार जागा सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून प्रत्येकी तीन जागा, झारखंडमधून दोन जागा तर उर्वरित राज्यांतून प्रत्येकी एक जागा रिक्त होत आहे.
या निवडणुकांमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या जागांवर होणाऱ्या निवडणुकांकडे राष्ट्रीय राजकारणाचेही लक्ष लागले आहे. राजस्थानमधून राजेंद्र गेहलोत, नीरज डांगी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्या जागाही रिक्त होत असल्याने अनेक राज्यांत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी १ जून रोजी अधिकृत अधिसूचना जारी होणार आहे. ८ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, ९ जून रोजी छाननी प्रक्रिया पार पडेल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ११ जून असेल. १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २० जूनपर्यंत पूर्ण होणार आहे.
राज्यसभा निवडणुका जाहीर होताच विविध पक्षांनी आपल्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्रात विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हालचालींना वेग आला असून, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. राज्यसभेतील संख्या बळ वाढवण्यासाठी सर्वच पक्ष रणनीती आखताना दिसत आहेत.