
नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण तापले असून, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर लेख लिहून शंका उपस्थित केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील मतदार यादीतील संशयास्पद वाढ, अनोळखी मतदारांचे मतदान, आणि बीएलओ अधिकाऱ्यांच्या तक्रारी यांचा उल्लेख करत निवडणूक आयोगावर सवाल उपस्थित केला आहे.
"मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात केवळ पाच महिन्यांत मतदार यादीत ८ टक्क्यांनी वाढ झाली. काही बुथवर २० ते ५० टक्क्यांनी मतदार वाढले. ही मतदारांची चोरी नाही का?" असं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे CCTV फुटेजची मागणी केली आहे.
"झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो..." राहुल गांधी, महाराष्ट्रातील मोठ्या पराभवामुळे तुमचं दुःख वाढणं स्वाभाविक आहे, आणि ते मी मान्य करतो. पण तुम्ही हे हवेत बाण सोडणं केव्हा थांबवणार आहात? तुमच्या माहितीसाठी सांगतो. महाराष्ट्रात असे २५ हून अधिक मतदारसंघ आहेत, जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान ८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांची वाढ झाली आहे, आणि याच ठिकाणी काँग्रेसने अनेक ठिकाणी विजय मिळवलेला आहे. माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाला लागून असलेल्या पश्चिम नागपूरमध्येच पाहा – येथे तब्बल ७ टक्के म्हणजेच २७,०६५ मतदारांची वाढ झाली आहे. आणि याच मतदारसंघातून काँग्रेसचे विकास ठाकरे निवडणूक जिंकतात!
भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून फडणवीस यांनी 1,29,401 मतं मिळवत, काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करत 42,000 हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. हा मतदारसंघ 1978 पासून भाजपकडेच आहे.
राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने तात्काळ प्रतिक्रिया देत म्हटलं की, "महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पडली असून, सर्व कायदेशीर नियमांचे पालन करण्यात आले आहे. मतदार यादी व मतमोजणी प्रक्रिया पूर्णपणे लोकप्रतिनिधी कायदा आणि निवडणूक नोंदणी नियमांतर्गत झाली आहे. कुठल्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही."
राहुल गांधींचे हे आरोप निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठा सवाल उपस्थित करत आहेत. या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागपूरमधील मतदारांमध्येही यामुळे संभ्रम निर्माण झाला असून, या वादाचा पुढील राजकीय परिणाम काय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.