
नाशिक: यंदाच्या जून महिन्यात नाशिक शहर आणि जिल्ह्यातील पावसाने दहा वर्षांतील सर्व विक्रम मोडत विक्रमी 315 मिमी पावसाची नोंद केली आहे. सलग सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, गंगापूरसह अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी, गोदावरी नदीला अवघ्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केवळ आठ दिवसांत धरणसाठा तब्बल १३ टक्क्यांनी वाढून २५% वरून ३८% पर्यंत पोहोचला आहे. गंगापूर धरण सध्या ६५% भरलेलं असून, यातून जवळपास ६,००० क्यूसेक वेगाने पाणी गोदावरी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गंगापूरसह दारणा, कडवा आणि नांदूरमध्यमेश्वर या महत्त्वाच्या धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. विशेषतः नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून तब्बल १५,००० क्यूसेस वेगाने पाणी सोडले जात आहे. या प्रचंड विसर्गामुळे गोदावरी नदीची पातळी झपाट्याने वाढत असून, काही ठिकाणी नदी पात्रालगत पाणी शिरल्याचे चित्र आहे.
यंदा मान्सून वेळेत दाखल झाल्याने २० जून रोजी गोदावरीला पहिला पूर आला होता. त्यानंतर केवळ काहीच दिवसांत, २३ जून रोजी दुसऱ्यांदा पूरस्थिती उद्भवली आहे. सोमवारी दुपारी २ वाजता गंगापूर धरणातून ६,१६० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली.
पूरस्थितीमुळे रामकुंड परिसरातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून, देशभरातून येणाऱ्या भाविकांना गोदाकाठावर धार्मिक विधी करण्यासाठी अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. पाणी पात्र वाढल्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातून गोदावरीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणालाही दिलासा मिळणार आहे. सध्या वाहणारे पाणी थेट जायकवाडीच्या दिशेने प्रवाहित होत असून, यामुळे त्या भागातील पाणीटंचाईच्या समस्यांवर काही प्रमाणात उपाय मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या नाशिक व त्र्यंबकेश्वर भागात पावसाची संततधार सुरू असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी काही दिवसांतही पावसाचा जोर कायम राहणार आहे. परिणामी, धरणसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्यांनी पूरस्थिती लक्षात घेऊन योग्य ती काळजी घ्यावी, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तसेच, नागरिकांनी नदीच्या काठावर अनावश्यक वावर टाळावा.
जूनमध्ये नाशिकमध्ये 315 मिमी पावसाची विक्रमी नोंद
गंगापूर धरण 65% भरले
8 दिवसांत धरण साठा 13% वाढला
गोदावरीला 2 वेळा पूर
रामकुंड परिसरात धार्मिक कार्यक्रमांना अडथळा
जायकवाडी धरणाला फायदा