
पुणे / मुंबई - पुणे शहरासाठी आणि महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा एक ऐतिहासिक क्षण समोर आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी यांनी QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये जगातील टॉप 1000 विद्यापीठांमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. या कामगिरीमुळे पुण्याची शैक्षणिक उत्कृष्टतेची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे. तर मुंबई विद्यापीठाने आपला शैक्षणिक दर्जा आणि जागतिक स्पर्धात्मकतेचा नवा टप्पा गाठत QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये राष्ट्रीय स्तरावर 17वे स्थान मिळवले आहे. मागील वर्षी विद्यापीठाला 20वे स्थान होते. ही झेप केवळ आकड्यांची नसून, विद्यापीठाच्या दीर्घकालीन शैक्षणिक धोरणे, संशोधनवृद्धी आणि जागतिक सहभाग यांची फलश्रुती आहे.
आंतरराष्ट्रीय मानांकनात झळकले पुण्याचे विद्यापीठ
लंडनस्थित Quacquarelli Symonds (QS) या जागतिक शैक्षणिक विश्लेषक संस्थेने जाहीर केलेल्या यंदाच्या रँकिंगनुसार,
एसपीपीयूला ५६६वे स्थान,
तर सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीला ६९६वे स्थान प्राप्त झाले आहे.
या यशाचे विशेषत्व असे की एसपीपीयूने गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ७५ स्थानांची झेप घेतली आहे. हे विद्यापीठ सध्या भारतातील सरकारी विद्यापीठांमध्ये १५व्या क्रमांकावर, तर महाराष्ट्रात आयआयटी बॉम्बेनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये एसपीपीयूने आघाडी घेतली आहे.
कठीण परिस्थितीतही यश
कमी शिक्षक संख्येसारख्या अडचणींनाही तोंड देत पुण्याच्या या संस्थांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले आहे. संशोधन कामगिरी, विद्यार्थ्यांची जागतिक रोजगार क्षमता आणि शैक्षणिक प्रतिमा या घटकांमध्ये सुधारणा झाल्यामुळे ही प्रगती शक्य झाली आहे.
भारताचा शैक्षणिक झपाटा
यंदा १५००हून अधिक विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले असून त्यातील ५४ भारतीय विद्यापीठांचा समावेश झाला आहे. यातील जवळपास ५०% विद्यापीठांनी आपले स्थान सुधारले आहे.
दिल्ली विद्यापीठानेदेखील ३२८ वे स्थान कायम राखले असून, २०२५ मध्ये त्याने ७९ स्थानांची झेप घेतली होती.
नवा निकष: आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विविधता
QS रँकिंगमध्ये यंदा पहिल्यांदाच ‘International Student Diversity’ (आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विविधता) हा नवा निकष समाविष्ट करण्यात आला आहे. या निकषात फक्त आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची टक्केवारीच नव्हे, तर त्यांच्या देशांची विविधता देखील विचारात घेतली जाते. पुण्याच्या जागतिक स्तरावरील संपर्क असलेल्या विद्यापीठांसाठी हा एक पूरक घटक ठरणार आहे.
एसपीपीयूचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची प्रतिक्रिया
एसपीपीयूचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले की, “विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर सुधारण्यावर, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यावर आणि नवी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे (NEP) अंगीकारण्यावर भर दिला जाईल.”
ते पुढे म्हणाले की, ड्युअल डिग्री प्रोग्राम, इंडस्ट्री-अकॅडमिया भागीदारी, तसेच संशोधन आणि नोकरीची संधी वाढवण्याची दिशा यामध्ये विद्यापीठ अधिक काम करणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत आणि परिणामकारकतेत लक्षणीय वाढ होईल.
पुणे – शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेचे केंद्र
पुण्याचे यश हे नोकरीच्या संधी, स्टार्टअप्सचा उदय आणि आंतरराष्ट्रीय संधींमुळे घडून आले आहे. या दोन्ही – गुणात्मक आणि संख्यात्मक प्रगतीने पुण्याचे शैक्षणिक क्षेत्र अधिक समृद्ध झाले आहे.
ही दोन्ही विद्यापीठे म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून, उद्याचे नेतृत्व घडवणाऱ्या विद्यार्थ्यांची पिढी तयार करणाऱ्या संस्था आहेत. पुण्याची ही झेप भारताला जागतिक शैक्षणिक पातळीवर मजबूत स्थान मिळवून देणारी ठरणार आहे.
मुंबई विद्यापीठाने आपला शैक्षणिक दर्जा आणि जागतिक स्पर्धात्मकतेचा नवा टप्पा गाठत QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये राष्ट्रीय स्तरावर 17वे स्थान मिळवले आहे. मागील वर्षी विद्यापीठाला 20वे स्थान होते. ही झेप केवळ आकड्यांची नसून, विद्यापीठाच्या दीर्घकालीन शैक्षणिक धोरणे, संशोधनवृद्धी आणि जागतिक सहभाग यांची फलश्रुती आहे.
महाराष्ट्रात पारंपरिक विद्यापीठांमध्ये दुसरा क्रमांक
या वर्षी मुंबई विद्यापीठाने महाराष्ट्रातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) हे 14व्या क्रमांकावर राहून राज्यात अव्वल ठरले आहे.
जागतिक स्तरावरही नोंदवला मोठा उड्डाण
क्वाक्वेरेली सायमंड्स (QS) या लंडनस्थित आंतरराष्ट्रीय शिक्षण विश्लेषक संस्थेने जाहीर केलेल्या यादीनुसार, मुंबई विद्यापीठाने जागतिक स्तरावर 664वा क्रमांक मिळवला आहे. मागील वर्षी विद्यापीठ 711-720 बँडमध्ये होते. 2021 मध्ये 1000च्या बाहेर असलेले स्थान, आज 664वर पोहोचल्यामुळे ही झेप अधिकच विशेष ठरते.
रोजगार संधीमध्ये सर्वोच्च कामगिरी
QS अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने विविध निकषांमध्ये चांगली प्रगती दाखवली असून, रोजगार संधी (Employment Outcomes) या निकषात 91 गुण मिळवत सर्वोच्च स्थान मिळवले आहे.
अन्य महत्त्वाचे गुण:
कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची प्रतिक्रिया
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी म्हणाले, "या यशाचे श्रेय आमच्या विद्यापीठाच्या प्रत्येक घटकाने घेतलेल्या सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध प्रयत्नांना जाते. आम्ही 'युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क' (UDRF) सुरू केले आहे, ज्यामुळे आम्हाला अधिक गुणात्मक सुधारणा करता येतील. वाढणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येने आणि नवीन शिक्षक भरतीमुळे भविष्यात अधिक मोठी झेप अपेक्षित आहे."
संशोधन आणि कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांत भर
विद्यापीठ प्रशासनानुसार, गेल्या काही वर्षांत मुंबई विद्यापीठाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण करार (MoUs) केले आहेत. विविध कौशल्याधारित आणि व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्याचबरोबर खेळ, सांस्कृतिक आणि जनसंपर्क कार्यक्रमांतही विद्यापीठाने आघाडी घेतली आहे.
संशोधनातील लक्षणीय प्रगती
१५६% वाढ आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित संशोधन लेखांमध्ये
१२ विभाग/संस्था राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत मान्यताप्राप्त
८० हून अधिक शिक्षक विविध व्यावसायिक संस्थांवर कार्यरत
१८ राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पुरस्कार शिक्षकांना प्राप्त
दरवर्षी सुमारे २० शिक्षक परदेशात शैक्षणिक उपक्रमासाठी जातात
मुंबई विद्यापीठाची ही कामगिरी केवळ जागतिक मानांकनापुरती मर्यादित नसून, देशाच्या उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेसाठीही महत्त्वाची आहे. ही झेप महाराष्ट्रातल्या इतर विद्यापीठांसाठी प्रेरणादायक ठरणारी आहे.