
आळंदी: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी वारीच्या प्रस्थान सोहळ्याच्या आदल्याच दिवशी, आळंदी शहराने इंद्रायणीच्या रौद्र रूपाचा अनुभव घेतला आहे. परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली असून, तिच्या पाण्याची पातळी आता धोक्याच्या मर्यादेवर पोहोचली आहे.
इंद्रायणीच्या पूरामुळे घाटावरील मंदिरे, महिला बदलण्याच्या खोल्या, पोलिसांचे स्वागत केंद्र, तसेच प्रसिद्ध भक्ती-सोपान पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. नदीच्या प्रवाहात जलपर्णींचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत असून, दृश्य अत्यंत भयावह आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घेत नदीघाट सर्वसामान्यांसाठी बंद केला असून, घाटावर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
या परिस्थितीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जीवरक्षक पथके आणि दोन बोटींनी सज्जता दाखवण्यात आली आहे. घाटावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात असून, भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे.
पावसाने आळंदी आणि आसपासच्या परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरीदेखील, वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. टाळ-मृदंगाच्या गजरात, पावसाच्या सरी झेलत, "ज्ञानोबा माऊली"च्या जयघोषात दिंड्या आळंदीत दाखल होत आहेत. त्या भक्तिभावाने न्हालेल्या चेहऱ्यांवर, पंढरपूरच्या वारीचा आनंद स्पष्ट दिसतो आहे.
आज, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पालखीचा प्रस्थान सोहळा आळंदीतून पंढरपूरकडे सुरू होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आणि भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. पावसाच्या अडचणी असूनही, वारीसाठीचा भक्तीभाव आणि समर्पण सर्व संकटांवर मात करताना दिसतो आहे. या वारीतील भक्तीचा समुद्र आणि इंद्रायणीचा पूर एकाच वेळी आळंदीत साक्षात अनुभवल्या जात आहेत.
इंद्रायणी नदीचा हा रौद्र अवतार प्रशासनासाठी आव्हानात्मक असला, तरी भाविकांची श्रद्धा आणि वारकऱ्यांची निष्ठा अभंग आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहेत, आणि नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरासह परिसरात सकाळपासून जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस वाढल्यामुळे 2000 क्युसेक पाणी मुळा-मुठा नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिडे पुलाच्या पायथ्याला पाणी पोहोचले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. लोणावळा परिसरात मळवली-देवळे गावाचा संपर्क तुटला आहे. अनेक भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
रायगड जिल्ह्यात हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, रोहा, सुधागड तालुक्यातील पाली-नागोठणे भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून अंबा नदीने धोका पातळी ओलांडल्याने आसपासच्या गावांमध्ये पाणी घुसले आहे. नागोठणे शहरात एसटी बस स्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेली, नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतर करत आहेत. पाली-खोपोली रस्ता बंद करण्यात आला आहे.
खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नगरपरिषदेने सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मटन मार्केट परिसरात पाणी घुसले आहे. खाडी पट्ट्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे खेड शहराला संभाव्य पूराचा धोका आहे.