
पुणे : सूर्य आग ओकायला लागण्यापूर्वीच पुणेकरांच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई यंदा लवकरच उग्र रूप धारण करू लागली आहे. पुण्यातील वानवडी परिसरात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना, महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्यात १ एमएलडी (MLD) कपातीचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची गरज वाढत असताना प्रशासनाचा हा 'रिव्हर्स गिअर' सर्वसामान्यांच्या मुळावर उठला आहे.
गेल्या आठ महिन्यांपर्यंत वानवडी परिसराला दररोज १० एमएलडी पाणी मिळत होते. शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता हा पुरवठा वाढवणे अपेक्षित होते. मात्र, पुणे महानगरपालिकेने तो वाढवण्याऐवजी ९ एमएलडीवर आणून ठेवला आहे. या अन्यायकारक कपातीविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल जांभूळकर यांनी आयुक्त आणि लष्कर पाणीपुरवठा विभागाला लेखी पत्राद्वारे जाब विचारला आहे.
पाणी कपातीचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागांची यादी मोठी आहे.
वानवडी गाव
होले मळा आणि जांभूळकर मळा
तात्या टोपे सोसायटी परिसर
एसव्हीनगर
या भागात पाणी इतक्या कमी दाबाने येत आहे की, साधी बादली भरण्यासाठीही तासनतास वाट पाहावी लागत आहे. यामुळे नोकरदार महिला आणि गृहिणींचे दैनंदिन वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश शिंदे यांच्या मते, वरिष्ठ स्तरावरून संपूर्ण शहराच्या पाणी नियोजनासाठी ही कपात करण्यात आली आहे. "तक्रारींचे निरसन सुरू आहे," असे आश्वासन प्रशासनाकडून दिले जात असले तरी, प्रत्यक्षात नळाला पाणीच येत नसल्याने हे दावे फोल ठरत असल्याची भावना रहिवाशांची आहे.
उन्हाळ्याची खरी ताप अजून सुरू व्हायची आहे, त्याआधीच वानवडीकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जर आत्ताच ही स्थिती असेल, तर मे महिन्यात काय होणार? असा भयावह प्रश्न पुणेकरांसमोर उभा ठाकला आहे.