
पुणे, मुळशी: अवघ्या काही महिन्यांपूर्वी वैष्णवीच्या डोळ्यांत संसाराचे सुंदर स्वप्न होतं. पण लग्नानंतर तिच्या आयुष्याचं रूपांतर एका अमानुष छळात झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा मृत्यू हे फक्त एक व्यक्तिगत दु:ख नाही, तर समाजाला अंतर्मुख करणारी धक्का देणारी घटना बनली आहे.
१६ मे रोजी गळफास घेतल्याचा दावा करणाऱ्या सासरकडच्यांनी तिच्या कुटुंबाला तोंडात वज्राघात करणारे शब्द ऐकवले. वैष्णवीच्या वडिलांनी जेव्हा तिच्या मृतदेहावरील जखमा पाहून सासरच्यांकडे सवाल केला, तेव्हा उत्तर आलं. “आम्हाला आधीच सांगितलं होतं, आम्हाला पैसे हवेत. तुझ्या पोरीला फुकट नांदवायचं का? म्हणून तिला मारून टाकलं!” ही कबुली नव्हे का एक निःसंशय हत्या?
वैष्णवीच्या कुटुंबाने:
५१ तोळे सोनं
फॉर्च्युनर गाडी
७ किलो तांब्याची भांडी
सोन्याची अंगठी आणि दीड लाखांचा मोबाईल
...हे सर्व दिलं. तरी सासरच्यांचा हावरटपणा थांबला नाही.
शेवटी त्यांनी जमिनीसाठी २ कोटींची मागणी केली. जेव्हा कुटुंबानं स्पष्ट नकार दिला, तेव्हा वैष्णवीचा छळ अधिकच वाढला.
१६ मे रोजी शशांकने वैष्णवीच्या वडिलांना फोन करून सांगितलं,
“तुमच्या लेकीला घेऊन जा.”
थोड्याच वेळात दुसरा फोन –
“गळफास घेतलाय.”
ती बावधनच्या चेलाराम रुग्णालयात पोहोचेपर्यंत मृत्यू पावली होती.
शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर:
हातावर, पायावर, मांडीवर व पाठीवर जखमा
मारहाणीच्या स्पष्ट खुणा
या बाबी अत्याचाराची आणि संभवित हत्येची ओरड करत आहेत.
ही केवळ एका मुलीची कहाणी नाही, तर हुंडा प्रथा, स्त्रियांवरील अत्याचार, आणि व्यवस्थेच्या दुर्लक्षावर प्रश्न विचारणारा आवाज आहे. तिच्या मृत्यूमागे जर खरंच गुन्हेगार आहेत, तर ते कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता तात्काळ शिक्षा मिळवायला हवी.