
Vaishnavi Hagawane Case: मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने १६ मे २०२५ रोजी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र तिच्या मृत्यूमागे हुंड्यासाठी झालेला छळ असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून, आता या प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे.
या प्रकरणात वैष्णवीचे पती शशांक आणि सासरे राजेंद्र हगवणे हे दोघेही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पाच दिवस उलटूनही आरोपी सापडत नसल्याने वैष्णवीच्या आई-वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. “गुन्हेगारांना पाठिशी घालणारं राजकीय वरदहस्त यामागे आहे का?” असा थेट सवाल वैष्णवीच्या वडिलांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणात एक महत्त्वाचा खुलासा वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी केला आहे. “लग्नावेळी अजित पवार स्वतः उपस्थित होते. लग्न लागल्यावर आशीर्वाद देताना त्यांनी गाडीकडे बोट दाखवत विचारलं – ‘फॉर्च्युनर गाडी त्यांनी मागितली की तुम्ही दिली?’” हे वाक्य अजितदादांनी बोलल्याचं कस्पटे यांनी सांगितलं. यावरूनच लग्नातच काहीतरी गडबड असल्याचा संकेत द्यायचा प्रयत्न अजित पवारांनी केला होता, असा अप्रत्यक्ष अर्थ निघतो.
अनिल कस्पटे भावुक होत म्हणाले, “माझ्या मुलीला मारहाण केल्यावरच तिला माहेरी पाठवलं गेलं. सासू आणि नणंद यांनी तिला मारहाण केली. मी तिच्या नंदेचे पाय धरले, पण त्यांनाही दया आली नाही.” एवढं सांगतानाही त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबेनात.
वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं की, हुंड्यासाठी सतत मागण्या होत होत्या.
– “माझ्याकडून ५१ तोळ्याचं सोनं, चांदीची भांडी मागितली.
– फॉर्च्युनर गाडीही त्यांनीच पसंत केली.
– दिवाळीला अंगठी द्यायला लावली.
– आणि काही दिवसांपूर्वी तर थेट दोन कोटी रुपयांची मागणी केली होती.”
या सर्व मागण्या पूर्ण करताना आमचं कंबरडंच तुटलं. पण मुलीचं सुख पहायचं म्हणून आम्ही काहीच बोललो नाही, असंही ते सांगतात.
वैष्णवीसारख्या मुलींच्या कहाण्या फक्त पोलिस फाईलमध्ये बंदिस्त न राहता, समाजानेही त्यावर आवाज उठवायला हवा. तिच्या कुटुंबाचा एकच प्रश्न आहे . “इतक्या अमानुष छळानंतरही न्याय मिळेल का?”