
पुणे : १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. ३१ डिसेंबर दुपारी २ वाजेपासून ते १ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील.
पुणे ते नगर प्रवास: पुण्याकडून अहमदनगरकडे जाणारी वाहने खराडी बायपासवरून मुंढवा, मगरपट्टा चौक, सोलापूर रोड, केडगाव चौफुला, न्हावरा आणि शिरूरमार्गे पुढे जातील.
मुंबई ते नगर प्रवास: मुंबईहून येणारी जड वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर आणि आळेफाटामार्गे नगरला जातील. हलक्या वाहनांसाठी चाकण-पाबळ-शिरूर हा मार्ग खुला असेल.
सातारा-कोल्हापूरकडून येणारी वाहने: कात्रज-हडपसर-केडगाव चौफुला मार्गे शिरूरच्या दिशेने मार्गस्थ होतील.
आळंदी-चाकणकडे जाणारी वाहने: सोलापूर रोडने येणारी वाहने हडपसर, मगरपट्टा आणि विश्रांतवाडी मार्गे पुढे जातील.
शहरात प्रवेश करणाऱ्या जड वाहनांसाठी खालील ठिकाणाहून बंदी घालण्यात आली आहे.
थेऊर फाटा (लोणी काळभोर), हॅरिस पूल (खडकी), बोपखेल फाटा (विश्रांतवाडी).
राधा चौक (बाणेर), नवले पूल (सिंहगड रोड), कात्रज चौक, खडी मशिन चौक (कोंढवा).
मंतरवाडी फाटा (फुरसुंगी) आणि मरकळ पूल.
प्रशासनाने अनुयायांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पार्किंग झोन निश्चित केले आहेत.
१. हलकी वाहने व कार: आपले घर परिसर (लोणीकंद), बौद्ध वस्ती आणि तुळापूर फाटा.
२. दुचाकी: मोनिक हॉटेल, रौनक स्वीट्स आणि आपले घर जवळील वाहनतळ.
३. बस व टेम्पो: खंडोबाचा माळ (थेऊर रोड), पेरणे गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मैदान, ज्ञानमुद्रा आणि सोमवंशी अकॅडमी परिसर.
आळंदी-तुळापूर इंद्रायणी पुलावरून जड वाहनांना पूर्णतः बंदी असून केवळ हलकी वाहने चालू राहतील. तसेच विश्रांतवाडी-लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जड वाहतूक पूर्णपणे बंद असेल. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन आपला प्रवास सुकर करावा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.