
Maharashtra : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आलेला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांनाच चक्रावून सोडलं आहे. पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून कोणालाही काहीही न सांगता, कोणताही सरकारी ताफा किंवा पोलीस संरक्षण न घेता अजित पवार अचानक रवाना झाले आहेत. त्यामुळे अजित पवार नेमके कुठे गेले, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. दरम्यान, त्याचे पुण्यातील लोकेशन सापडले असून विनासुरक्षा ते गेल्याचे समोर आले आहे. त्यांनी सकाळी असे का केले, याची माहिती समोर आलेली नाही.
मागील काही दिवसांपासून अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये विविध नियोजित बैठकांसाठी मुक्कामाला होते. मात्र, अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता ते हॉस्टेलमधून बाहेर पडले. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत नेहमी असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार आणि सुरक्षारक्षकांचा ताफा मात्र हॉस्टेल परिसरातच उभा राहिला. अजित पवार एकटेच निघून गेल्याने उपस्थित अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. जागावाटपाचं सूत्रही जवळपास ठरल्याचं बोललं जात होतं. मात्र, ऐनवेळी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, या मुद्द्यावरून ही चर्चा फिसकटल्याची माहिती समोर येत आहे. ही चर्चा अयशस्वी ठरल्यानंतरच अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडल्याने या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकीकडे शरद पवार गटाशी चर्चा फिसकटल्यानंतर अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. काही जण हा निर्णय कौटुंबिक कारणांमुळे घेतल्याचं सांगत असले, तरी यामागे मोठं राजकीय गणित दडलं असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अजित पवारांच्या या अचानक हालचालीमुळे महापालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीच्या राजकारणात नवे वळण येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.