Pune Rain News : पुण्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
Pune Rain News : पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर कोसळेल्या पावसामुळे आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना सूचना दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीआरएफ, सैन्याला मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
पुणे शहराच्या सखल भागात साचलं पाणी
पुण्यात रात्रभर पावसाची संततधार असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे एनडीआरएफकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून बचाव व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले.
अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना फोनवरुन दिल्या सूचना
"मी पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, एनडीआरएफ आणि अधिकाऱ्यांशी मी फोनवरुन बोललो आहे. एनडीआरएफच्या बोटी आधीच रवाना करण्यात आल्या आहेत. मदत लवकरात लवकर पोहोचत असून आता लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्यासोबत बोललो असून ते कंट्रोल रुममध्ये आहेत," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
पालकमंत्री अजित पवार यांनी पूरपरिस्थिती घेतला आढावा
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी फोनवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
'आपत्तीग्रस्त नागरिकांच्या निवारा व अन्नधान्याची सोय करा'
यासोबत मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून महापालिका आयुक्त विभागीय आयुक्तांची फोनरून चर्चा करत बचाव आणि मदतकार्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांचीही मदत तातडीने उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. आपत्तीग्रस्त नागरिकांच्या निवारा व अन्नधान्याची सोय करावी. राज्य प्रशासन तसेच राज्य आपत्ती निवारण यंत्रणेने जिल्हा यंत्रणांशी संपर्क ठेवून परस्पर समन्वय व सहकार्याने काम करावे, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.
आणखी वाचा :
मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, रहिवाशी परिसरात घुसले पाणी