
पुणे: पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं, अशी मागणी भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. मात्र त्यांच्या या मागणीनंतर शहरात एक वेगळाच वाद पेटला आहे. ठाकरे गटाने लावलेले उपरोधिक बॅनर्स शहरात चर्चेचा विषय ठरले, आणि नंतर वादाच्या पार्श्वभूमीवर ते हटवण्यात आले.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे की, देशातील प्रमुख स्थळांवर त्या शहराचा ऐतिहासिक वारसा दिसावा. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाचं नाव थोरले बाजीराव पेशवे यांच्यावरून ठेवावं, अशी माझी मागणी आहे. पुण्याच्या इतिहासाचं प्रतिक या नावातून उमटलं पाहिजे." कुलकर्णींनी ही मागणी ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती.
या मागणीनंतर लगेचच ठाकरे गटाकडून पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर बॅनर्स झळकले. बॅनरमध्ये मेधा कुलकर्णी यांचं एक व्यंगचित्र होतं आणि त्यावर लिहिलं होतं. “कोथरुडच्या बाई, तुम्हांस नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा!” हे बॅनर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे विभागप्रमुख मुकुंद चव्हाण आणि उपविभागप्रमुख गिरीश गायकवाड यांच्या नावाने लावण्यात आले होते. मात्र वादाची शक्यता लक्षात घेता, ही पोस्टर्स अखेर काढण्यात आली.
दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी यावर ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, “पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याचा आमचा विरोध आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांची जयंती सुरु केली, तसेच स्त्री शिक्षणाचा यशस्वी लढा दिला. त्यामुळे या स्थानकाला फुले यांचेच नाव दिले जावे.”
पुणे स्टेशनच्या नावाबाबत विविध मागण्या आणि प्रतिक्रिया येत असताना, या मुद्यावरून राजकीय टीका-टिप्पणी आणि उपरोधात्मक हल्ल्यांनी रंगत वाढली आहे. एकीकडे ऐतिहासिक वारसा जपण्याच्या नावावर नव्या नामकरणाची मागणी होत आहे, तर दुसरीकडे सामाजिक योगदानाच्या आधारावर फुले यांचं नाव देण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
पुणे स्टेशनचं नामांतर होणार की नाही, आणि झाल्यास कोणाच्या नावावर, हे अद्याप अनिश्चित असलं तरी या विषयावरून पुण्यातील राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. ‘कोथरूडच्या बाई’पासून ‘मस्तानी पेठ’पर्यंतच्या या वादाने एक वेगळाच रंग घेतला आहे.