Pune Railway Station major change : पुणे रेल्वे स्थानकावर विशेष भर देण्यात येणार आहे. त्यामुळे या रेल्वे स्टेशनचा येत्या काही वर्षात कायापालट झालेला दिसून येईल. यासाठी 60 अतिरिक्त नवीन गाड्या, 6 नवीन प्लॅटफॉर्म आणि 'सॅटेलाइट टर्मिनल'ही होणार आहे.
पुणे शहराच्या वाढत्या विस्तारासोबतच येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने कंबर कसली आहे. येत्या पाच वर्षांत पुण्याच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये मोठे बदल होणार असून, क्षमता, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत ६० अतिरिक्त नवीन गाड्या, ६ नवीन प्लॅटफॉर्म आणि मुख्य स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी 'सॅटेलाइट टर्मिनल'ची निर्मिती केली जाणार आहे.
26
प्रवासी संख्येत आणि फेऱ्यांमध्ये मोठी वाढ
सध्या पुणे रेल्वे विभाग दररोज सुमारे ११० उपनगरीय गाड्यांच्या फेऱ्या चालवतो. या विस्तारीकरणानंतर ही संख्या १८० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे ३ लाख प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः पुणे-दौंड मार्गावरील गाड्यांची संख्या ७५ वरून थेट १२५ पर्यंत वाढवण्यात येणार आहे.
पुणे रेल्वे विभागाचे प्रवक्ते हेमंत कुमार बेहरा यांनी सांगितले की, "या विस्तारामुळे केवळ गाड्यांची संख्याच वाढणार नाही, तर गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा होईल आणि प्रवाशांचा प्रतीक्षा वेळ कमी होईल. यामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होईल."
36
पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण आणि स्थानकांचा विकास
वाढत्या रेल्वे गाड्यांना सामावून घेण्यासाठी पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या स्थानकांचा विकास केला जाणार आहे:
पुणे स्टेशन: ६ नवीन प्लॅटफॉर्मची बांधणी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी सध्याच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे.
हडपसर: उपनगरीय वाहतूक सुरळीत करण्यासाठी ३ प्लॅटफॉर्मचा विस्तार.
खडकी: प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ ची उंची आणि लांबी वाढवणे.
आळंदी: ९ प्लॅटफॉर्म, ८ पिट लाईन्स आणि ८ स्टॅबलिंग लाईन्ससह नवीन 'कोचिंग टर्मिनल'.
उरुळी कांचन (मेगा टर्मिनल): १० प्लॅटफॉर्म (ज्यात ४ EMU स्पेसिफिक आहेत), १० पिट लाईन्स आणि १० स्टॅबलिंग लाईन्स.
फुरसुंगी: उपनगरीय गाड्यांसाठी ५ नवीन स्टॅबलिंग लाईन्स.
याशिवाय, ७५ विद्यमान गाड्यांमध्ये १९८ नवीन डबे (Coaches) जोडले जातील, ज्यामुळे अतिरिक्त २०,००० प्रवाशांची सोय होईल. नवीन ६० गाड्यांमुळे दररोज आणखी १.५ लाख नागरिक प्रवास करू शकतील.
56
'सॅटेलाइट टर्मिनल्स'मुळे पुणे स्टेशनचा भार होणार कमी
पुणे मुख्य स्टेशनवरील जागेची मर्यादा लक्षात घेता, रेल्वेने आळंदी, उरुळी आणि फुरसुंगी येथे 'सॅटेलाइट टर्मिनल्स' विकसित करण्याचे नियोजन केले आहे. या उपनगरांतील टर्मिनल्समुळे मुख्य स्टेशनवरील प्रवाशांची आणि गाड्यांची गर्दी विभागली जाईल. यामुळे गाड्यांच्या उपलब्धतेत वाढ होऊन प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळणे सोपे होईल.
66
विकासाचे 'व्हिजन २०२९'
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील ४८ प्रमुख स्थानकांच्या क्षमता वाढीचा हा एक भाग आहे. पुणे रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मते, हा पाच वर्षांचा आराखडा पूर्ण झाल्यावर पुणे स्टेशनची कार्यक्षमता दुप्पट होईल, ज्यामुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येची आणि प्रवाशांची गरज यशस्वीपणे पूर्ण करता येईल.