मनोज जरांगे बिनबुडाचा लोटा, ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या लक्ष्मण हाकेंचा आरोप

लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी जरांगे यांना 'बिनबुडाचा लोटा' म्हटले असून ओबीसी उमेदवारांना पाडण्याचा आरोप केला आहे. जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता असल्याचेही हाके म्हणाले.

पुणे: मनोज जरांगे पाटील हा बिनबुडाचा लोटा आहे. ज्या लोकांनी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करायला प्रवृत्त केले त्या लोकांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आणि ओबीसी उमेदवार पाडण्याचे काम केले. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, असे वक्तव्य ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केले. एका बाजुला जरांगे स्वत:ला 96 कुळी मराठे आहोत म्हणतात आणि दुसरीकडे मागासवर्गीयांच्या ओबीसीतून आरक्षण मागतात. हा प्रचंड विरोधाभास असून ही गोष्ट हास्यास्पद आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी 288 उमेदवार रिंगणात उतरवल्यास ओबीसी समाजाने आणि सुज्ञ नागरिक याचा जाब मनोज जरांगे यांना नक्की विचारतील, असा विश्वास हाके यांनी व्यक्त केला. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. वडीगोद्री येथे केलेले उपोषण सोडताना सरकारने काही आश्वासने दिली होती. त्याची पुर्तता अद्याप केलेली नाही, असे त्यांनी म्हटले. मनोज जरांगे यांच्याकडून राज्यभरात काढण्यात येणाऱ्या मराठा शांतता रॅलीला आमचा आक्षेप आहे. शांतता रॅलीला शाळा का बंद ठेवल्या जातात? याचा अर्थ आम्ही कायदा आणि सुव्यवस्था सरकार पाळू शकत नाही का?, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

सरकार जरांगेंना रेड कार्पेट घालतंय, आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत: लक्ष्मण हाके

राज्यातील बोगस कुणबी नोंदीवर आम्ही आक्षेप घेतला होता. मात्र, त्यावर सरकारने काहीही कारवाई केलेली नाही, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांना रेड कार्पेट घालत आहेत. ⁠जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. ⁠शरद पवार यांनी सर्वपक्षीय तसेच ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांच्या एकत्रीत बैठक बोलवनाच्या सुचनेचे आम्ही स्वागत करतो. आम्ही या बैठकीला नक्की जाऊ, असे हाके यांनी म्हटले.

प्रशासनामार्फत तीन वर्षांपासून नगरपालिका, महापालिका, जिल्हा परीषदेचा कारभार चालवला आहे. त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळे ओबीसींचे हक्क डावलले जात असल्याचा आरोप हाके यांनी केला.

आणखी वाचा :

जरांगेंची नाशिकमध्ये गर्जना, भुजबळांच्या बालेकिल्ल्यात उदयनराजेस्टाईल उडवली कॉलर

भुजबळांचे आव्हान जरांगे स्वीकारणार का?, 29 ऑगस्टला निर्णय जाहीर करणार

 

Share this article