'एकातरी बहिणीचा अर्ज रद्द करून दाखवा', सुप्रिया सुळेंचा सत्ताधार्‍यांना टोला

लाडकी बहीण योजनेवरून राजकीय वातावरण तापले. विरोधीपक्ष या योजनेला निवडणुकीचा जुमला म्हणत टीका करत आहेत तर सत्ताधारी पक्ष या योजनेचे समर्थन करत आहेत. या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी या योजनेवरून सत्ताधार्‍यांना टोला लगावला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. सत्ताधारी या योजनेच्या माध्यमातून महिला वर्गापर्यंत पोहोचण्याचे काम करत आहे तर विरोधक आगामी निवडणुकीसाठीचा हा जुमला आहे, असे म्हणत टीका करत आहे. अशातच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात देखील झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत. मात्र याचदरम्यान (राष्ट्रवादी काँग्रेस) शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षांना डिवचले आहे, तर अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे आम्हाला मी असलेल्या वाढत्या प्रतिसादामुळे नैराश्यातून बोलत आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळेंच्या पोस्टवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

आम्ही सुरू केलेली योजना क्रांतीकारी ठरत असल्यामुळे अमोल कोल्हेंना नैराश्य आले असेल. आता आमची यात्रा जोरात सुरू अनेक कार्यक्रम होत आहेत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे कोल्हेंना नैराश्य आले आहे, असे यावेळी तटकरे म्हणाले, तर सुळेंच्या पोस्टवर बोलताना ते म्हणाले, सुप्रिया सुळे अलिकडे असे का बोलत आहेत मला कळत नाही, कोणी कोणावर बळजबरी करण्याचे कारण नाही, गेल्या काही दिवसांत नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे, कोण कोणाला सक्ती करणार नाही, हा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, त्यांच्या या आरोपावर लक्ष देण्याचे कारण नाही, अजित दादांना मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून त्यांना नैराश्य आले असल्याचंही यावेळी तटकरे म्हणाले आहेत.

 

 

सुप्रिया सुळेंच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीया एक्स (पुर्वीचे ट्विटर) वरती एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मोबाईवरील एक मेसेजचा फोटो शेअर करत एकातरी बहिणीचा अर्ज रद्द करुन दाखवा, असे आव्हान दिले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला 'भाऊ' म्हणवित आहेत. बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार... अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, 'बहिण-भावाचं' नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमाने काही मागितले तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.

आणखी वाचा :

लाडकी बहिण योजनेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल, श्रीकांत शिंदेंना म्हटलं 'बेशर्म'

Share this article