राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र सरकारवर निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, सरकारला जनतेने नापास केल्याचे दिसत असल्यानेच निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
परभणी: महाराष्ट्रातील जनतेने सरकारला नापास केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी दिल्लीतील पिताश्रीला सांगून निवडणूक पुढे ढकलली असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप प्रणित महायुती सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. तसेच गेल्या 15 वर्षांत पहिल्यांदाच महाराष्ट्र आणि हरियाणा यांची निवडणूक एकत्र होत नसल्याचेही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
परभणीच्या गंगाखेडमध्ये आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या निमिताने आयोजित करण्यात आलेल्या सभेत अमोल कोल्हे बोलत होते. या सभेला गंगाखेडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे उदाहरण देत सरकारवर निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप करत जोरदार हल्ला चढवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, "कॉसेजमध्ये ज्याचे चालत होते, कॉलेजच्या मालकाचे ते पोरगं होते. त्या पोराचा अभ्यासच झाला नव्हता परीक्षेचा. त्या पोराला दररोज वाटायचे, परीक्षेत नापास होईल की काय? परीक्षेत नापास होईल की काय? पोरांनी लय प्रयत्न केले, गाईड बघितले, कॉपी केली, सगळे सगळे केले. पण तरीही पोरांची गॅरंटीच पटली, काहीही झाले तरी आपण नापासंच होणार. जेव्हा पोरांची गॅरंटी पटली, त्यावेळी त्यांना बापाला जाऊन सांगितले. जरा परीक्षा पुढे ढकला ना... बापाने विचारले परीक्षा कशाला पुढे ढकलायची रे? नियमानुसार आता परीक्षा झाली पाहिजे. दादा... अभ्यासच नाही झालाय... अभ्यासच झाला नसेल, तर परीक्षा पुढे ढकला. पोरगं कोण कळाले का?"
धाकधुक धाकधुक व्हायला लागलंय म्हणूनच निवडणूक पुढे ढकलली: अमोल कोल्हे
"जी ऑक्टोबरमध्ये व्हायची, ती नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली, कारण पोराला कळले महाराष्ट्राची जनता नापास होणार आहे. म्हणून महायुती सरकारने त्यांच्या दिल्लीतील पिताश्रींना सांगितले, तेवढे निवडणूक आयोगाला सांगा, कुठलातरी क्लॉज वापरा. 15 वर्ष हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक बरोबर व्हायची, यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्राची निवडणूक हरियाणाबरोबर होत नाही. माननिय निवडणूक आयोगाने पाऊस पितृपक्ष, गणेशोत्सव, दिवाळी कितीही कारणं दिली असली, तरी महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे, सरकारचे धाकधुक धाकधुक व्हायला लागलंय आणि म्हणूनच निवडणूक पुढे ढकलंली.", असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
आणखी वाचा :
उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीच्या सभेतून हल्लाबोल, निवडणूक लढतीचा दिला इशारा