
पुणे: पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. भुजबळ चौकातील हिंजवडी-वाकड उड्डाणपुलावर दुचाकी वाहनांना ठराविक वेळेत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ही अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली असून, सकाळपासूनच लाऊडस्पीकरद्वारे याची घोषणा करण्यात येत आहे.
वाहतूक विभागाने स्पष्ट केलं आहे की, दुचाकींवर ही बंदी कायमस्वरूपी नसून फक्त गर्दीच्या वेळेतच लागू राहणार आहे. या वेळा पुढीलप्रमाणे आहेत.
सकाळी: 8:00 ते 11:00
संध्याकाळी: 5:00 ते रात्री 9:00
या वेळांदरम्यान दुचाकीस्वारांना उड्डाणपुलाचा वापर करता येणार नाही, मात्र इतर वेळात नेहमीप्रमाणे ते उड्डाणपुलावरून जाऊ शकतात.
उड्डाणपुलावर दुभाजक (डिव्हायडर) नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हा पूल केवळ चारचाकी वाहनांसाठी मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी सांगितले की ही बंदी सध्या प्रायोगिक तत्वावर किमान दोन आठवडे राहणार आहे. अद्याप या निर्णयाबाबत कोणतेही अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध झालेले नाही.
वाकडहून हिंजवडीकडे जाणारे दुचाकीस्वार
उड्डाणपुलाऐवजी सुर्या अंडरपासवर डावीकडे वळावे
लगेच यू-टर्न घेऊन पुढे जाता येईल
यामुळे फक्त 50 ते 100 मीटर अंतर वाढेल
हिंजवडीहून वाकडकडे येणारे दुचाकीस्वार
सयाजी अंडरपासवर डावीकडे वळून यू-टर्न घेण्याची सोय करण्यात आली आहे
या नव्या व्यवस्थेमुळे कोणतीही अडचण, सूचना किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी पुढील ठिकाणी संपर्क साधावा:
हिंजवडी वाहतूक विभाग कार्यालय, भुजबळ चौक
मुख्य वाहतूक शाखा, एल्प्रो मॉलजवळ, चिंचवड गाव
बंदी कोणावर? फक्त दुचाकी वाहनांवर
कोणत्या वेळेस? सकाळी 8 ते 11, संध्याकाळी 5 ते 9
बंदी का? उड्डाणपुलावर दुभाजक नसल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून
पर्यायी मार्ग सुर्या अंडरपास आणि सयाजी अंडरपासमार्गे यू-टर्न
तक्रारी कुठे नोंदवाव्यात? हिंजवडी ट्राफिक ऑफिस किंवा चिंचवड ट्राफिक शाखा