
मुंबई : पुण्यात मिरवणुकीदरम्यान डीजेच्या टेम्पोने पथकातील वादकांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांची परवानगी न घेता वाढदिवसाची मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र, या जल्लोषाने एका युवकाचा जीव घेतला, तर सहा जण जखमी झाले. १० सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास जुन्नर बाजार समितीच्या आवारात ही घटना घडली. या अपघातामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
एकुलत्या एक मुलाचा मृत्यू
या घटनेत आदित्य सुरेश काळे (२१, रा. शिवेची वाडी, ता. जुन्नर) या युवकाचा मृत्यू झाला. आदित्य हा माणिकडोह येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो वेळ मिळेल तेव्हा झांज पथकात वादन करत असे. त्याला मोठी बहीण असून ती पोलिस सेवेत कार्यरत आहे, तर वडील सुरेश काळे हे खामगावचे उपसरपंच आहेत. एकुलत्या एक मुलगा गमावल्यामुळे काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रुग्णालयासमोर नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला.
सहा जण गंभीर जखमी
अपघातात गोविंद शंकर काळे (३३), विजय हिरामण केदारी (२४), सागर सुनील केदारी (२६), बाळू किसन काळे (२९), सचिन गणपत केदारी (३२, सर्व रा. शिवेची वाडी) आणि किशोर रामचंद्र घोगरे (३५, रा. सोमतवाडी, ता. जुन्नर) हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. झांज पथकात वादन करत असताना भरधाव टेम्पोने त्यांना चिरडले. अपघातानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
माजी झेडपी अध्यक्षांसह चौघांवर गुन्हा दाखल
या अपघातात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम सखाराम लांडे, त्यांचा मुलगा अमोल लांडे, डीजे सिस्टीम मालक सौरभ वाल्मीक शेखरे आणि चालक नामदेव विठ्ठल रोकडे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे व निरीक्षक किरण अवचर यांनी ही माहिती दिली. धोंडू भिका काळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, आरोपींवर परवानगीशिवाय मिरवणूक काढणे, कर्णकर्कश डीजे वाजवणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे या गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
फिर्यादीच्या माहितीनुसार, वाढदिवसाच्या मिरवणुकीत देवराम लांडे आणि अमोल लांडे यांनी हातवारे करून डीजेची गाडी पुढे घेण्यास सांगितले. चालकाने निष्काळजीपणे गाडी भरधाव वेगाने पुढे नेली आणि झांज पथकातील वादकांना धडक दिली. या धडकेत आदित्यचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. निष्काळजीपणा आणि बेकायदेशीर मिरवणुकीमुळे एका युवकाचे आयुष्य संपुष्टात आले आणि कुटुंबीयांवर अपरिमित दु:खाचा डोंगर कोसळला आहे.