Pune Fuel Shortage Crisis: इराण-इस्रायल युद्धजन्य परिस्थितीमुळे पुण्यात भीषण इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांनी पंपचालकांना आगाऊ पैसे भरण्यास सांगितल्याने पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
पुणे : पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता पुणेकरांच्या खिशाला आणि रोजच्या जगण्याला बसू लागला आहे. पुण्यात आगामी काळात भीषण इंधन टंचाई (Fuel Shortage) निर्माण होण्याचे संकेत मिळत असून, पेट्रोल कंपन्यांनी पंपचालकांना दिलेला 'अलर्ट' चिंतेत भर टाकणारा आहे.
26
पेट्रोल-डिझेलसाठी आता 'रोख' व्यवहार; कंपन्यांचे धोरण बदलले
गेल्या अनेक वर्षांपासून तेल कंपन्या पेट्रोल पंपचालकांना ७ ते ८ दिवसांची क्रेडिट सुविधा (उधारी) देत होत्या. मात्र, युद्धाच्या सावटाखाली खनिज तेलाच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने कंपन्यांनी आता कठोर पाऊल उचलले आहे.
नवा नियम
"जर दररोज पुरवठा हवा असेल, तर आगाऊ (Advance) पैसे भरा." असा मेसेज तेल कंपन्यांनी पुणे जिल्ह्यातील पंपचालकांना धाडला आहे. यामुळे पंपचालकांकडे खेळते भांडवल कमी पडल्यास पुण्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
36
घरगुती गॅसचे दर भडकले; गृहिणींचे बजेट कोलमडले
केवळ पेट्रोलच नव्हे, तर घरगुती गॅसच्या (LPG) वाढत्या किमतींनी महिलांमध्ये संतापाची लाट आहे. "किराणा, तेल आणि आता गॅस सिलेंडर महागला आहे, पण पगार मात्र वाढत नाहीत. गॅस एजन्सीकडे चकरा मारूनही वेळेवर सिलेंडर मिळत नाही आणि काही ठिकाणी तो चक्क चढ्या दराने (ब्लॅक) विकला जात आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया सामान्य गृहिणी व्यक्त करत आहेत.
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात एकाएकी १५० ते २०० रुपयांची वाढ झाल्याने पुणेकर हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक हॉटेल्समधील शेगड्या विझण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी हॉटेल असोसिएशनकडून केली जात आहे.
56
स्मशानभूमीतील दाहिन्याही पडल्या बंद!
या इंधन टंचाईचा सर्वात हृदयद्रावक परिणाम पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत पाहायला मिळत आहे. गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे येथील पाच गॅस दाहिन्या गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. परिणामी, अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना विद्युत दाहिनी किंवा पारंपरिक लाकडांचा आधार घ्यावा लागत आहे.
66
युद्धाचा भारतावर परिणाम का?
१. पुरवठा साखळी खंडित: इराण-अमेरिका संघर्षामुळे आखाती देशांतून होणारी इंधनाची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
२. नैसर्गिक वायूचा तुटवडा: कतारमधून येणारा गॅस पुरवठा कमी झाल्याचा फटका महाराष्ट्राला बसत आहे.
प्रशासनाने इंधन साठ्याबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही, मात्र पुणेकरांनी इंधनाचा वापर जपून करणे आवश्यक असल्याचे चित्र दिसत आहे.
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.