
पुणे : नाताळच्या (Christmas) निमित्ताने पुण्यातील एम.जी. रोड आणि कॅम्प परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. सेलिब्रेशनसाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी २४ आणि २५ डिसेंबर रोजी विशेष नियमावली लागू केली आहे. आज आणि उद्या सायंकाळी ७ वाजल्यापासून अनेक रस्ते बंद राहतील, तर काही मार्गांवर बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडीत अडकण्यापेक्षा, हे नवे बदल समजून घेऊन आपला प्रवास सुखकर करा.
१५ ऑगस्ट चौक: वाय जंक्शनकडून एम.जी. रोडकडे येणारी सर्व वाहने येथे थांबवली जातील. ही वाहतूक कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाच्या दिशेने वळवण्यात आली आहे.
इस्कॉन मंदिर चौक: इस्कॉन मंदिर चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि अरोरा टॉवरकडे जाणारे रस्ते बंद राहतील. वाहनचालकांनी एसबीआय हाऊस चौकातून उजवीकडे वळून तीन तोफा चौक आणि लष्कर पोलीस ठाण्यामार्गे पुढे जावे.
व्होल्गा चौक: येथून महम्मद रफी चौकाकडे जाता येणार नाही. पर्याय म्हणून वाहनचालकांनी ईस्ट स्ट्रीट रस्त्याचा वापर करून थेट इंदिरा गांधी चौकाकडे जावे.
इंदिरा गांधी चौक: या चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून, ती लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळवण्यात आली आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले की, चर्च आणि बाजारपेठांमध्ये पादचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. गर्दीच्या वेळी वाहनांमुळे अपघात होऊ नयेत आणि विनाकारण कोंडी होऊ नये, यासाठी हे तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
टीप: शक्य असल्यास कॅम्प परिसरात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा किंवा वाहने पार्किंगच्या सुरक्षित ठिकाणी उभी करा.