
अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून तुकाराम मुंडे हे चर्चेत आहेत. त्यांनी भेसळखोर चोरांना चांगली अद्दल घडवली आहे. त्यांनी केलेल्या कामामुळं त्यांचं सर्वसामान्य जनतेतून खऱ्या अर्थानं कौतुक होत आहे. पण आता त्यांच्याबाबतची एक नवीन अपडेट समोर आली आहे. त्यामुळं सामान्य जनतेत मात्र नाराजी पसरली आहे.
तुकाराम मुंडे यांना पदावरून हटवले असून त्यामुळं खळबळ उडाली आहे. परभणी जिल्ह्याच्या पालक सचिव पदावरून तुकाराम मुंडे यांना हटवण्यात आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार हा तुकाराम मुंडे यांच्याकडे अजूनही आहे. सामान्य प्रशासन विभागानं याबाबतचा आदेश जारी केला आहे.
तुकाराम मुंडे यांची नियुक्ती एक महिन्यातच रद्द करण्यात आली आहे. त्यांच्याकडं असलेली पालक सचिवपदाची जबाबदारी हि दुसऱ्या अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. पालक सचिव पद म्हणजे शासनाचे धोरणात्मक निर्णय, प्रशासकीय सुधारणा आणि विविध लोकोपयोगी व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी हि या अधिकाऱ्यावर असते.
तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि भेसळ विभागाची जबाबदारी घेतल्यापासून भेसळखोरांची पळता भुई थोडी झाली. दूध भेसळ करणारे थांबले. कार्बाइड टाकून आंबे विक्री करणाऱ्यांना चाप बसला. गुटखा आणि तंबाखू विक्री थांबली. तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाचा कारभार हातात घेतल्यापासून सामान्य लोक सुखावले आहेत.