
नागपूर: "एखादी सुंदर मुलगी असेल, तर तिच्यावर अनेक जण प्रेम करतात. पण त्यात तिचा काय दोष?" अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपमधील आयारामांवर मार्मिक टिप्पणी करत गोंधळ घातलेल्या राजकीय प्रवेशांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या ११ वर्षांतील कार्यकाळानिमित्त नागपूरमधील कविवर्य सुरेश भट सभागृहात गडकरींची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. वरिष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या संयोजनात ही विशेष मुलाखत रंगली. यावेळी भाजपमध्ये विविध पक्षांतील नेत्यांचा होणारा प्रवेश विशेषतः सुधाकर बडगुजर यांचा यावर प्रश्न विचारण्यात आला असता, गडकरींनी रोखठोक भाषेत आपली मते मांडली.
"बडगुजर यांचा मी चेहरादेखील पाहिलेला नाही. हे कोण आहेत, मला माहिती नाही," असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षप्रवेशांवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये एकच खसखसाट उडाला.
गेल्या अकरा वर्षांतील मोदी सरकारच्या कामगिरीवर भाष्य करताना गडकरी म्हणाले, "अजून पूर्ण चित्रपट बाकी आहे." त्यांनी आपल्या मंत्रालयात झालेल्या प्रगतीचा दाखला देत सांगितले की, भारतातील ऑटोमोबाइल उद्योग १३ लाख कोटींवरून २२ लाख कोटींवर पोहोचला आहे. येत्या पाच वर्षांत हा उद्योग देशात सर्वात मोठा होऊन १० कोटी रोजगारांची निर्मिती करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
"पाणी, वीज आणि कचऱ्याच्या समस्यांसाठी नागपूरमध्ये मागील पाच वर्षांत एकही मोर्चा निघालेला नाही," असे सांगत त्यांनी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप १०८ पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रमात गडकरींनी आपले अनुभवही शेअर केले. हायड्रोजन कार घेऊन संसदेत गेले असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले होते, हे सांगताना त्यांनी एक किस्सा सांगितला. "त्यांना समजावावं लागलं की ही हायड्रोजन कार आहे," असे त्यांनी हसत सांगितले. त्यांनी भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाचे स्वप्नही यावेळी मांडले.
हिंदुत्वावर प्रश्न विचारल्यानंतर गडकरी म्हणाले, "हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे. ती कोणत्याही धर्माविरुद्ध नाही. काँग्रेसने हिंदू शब्दाचा चुकीचा अर्थ लावला आहे." ते पुढे म्हणाले की, "भारतीयत्व आणि राष्ट्रीयत्व हेच खरे हिंदुत्व आहे."
नितीन गडकरी यांच्या या मुलाखतीत त्यांनी विकास, ऊर्जा, पक्षातील घडामोडी आणि वैचारिक भूमिकांवर आपले मत स्पष्ट मांडले. त्यांच्या थेट आणि नम्र शैलीतून राजकारणातील अनेक स्तरांना अर्थपूर्ण संदेश दिला गेला.