
बीड: बीड जिल्ह्यातील केज-अंबाजोगाई रोडवर आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने पायी जाणाऱ्या युवकाला जोरदार धडक दिली. या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला असून कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
हादरवून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
केज-अंबाजोगाई मार्गावर गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. खराब रस्ते, वाहनांचा भरधाव वेग आणि अपुऱ्या सुरक्षितता उपाययोजना यामुळे हा मार्ग अक्षरशः ‘अपघातप्रवण’ झाला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत, ही खंत व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील जायकोचीवाडी गावातील नागरिकांनी आज रस्त्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. खामगाव-पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.
गेल्या 35 वर्षांपासून गावात पक्का रस्ता नसल्याने गर्भवती महिला, शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. या आंदोलनात आझाद क्रांती सेनेच्या नेतृत्वाखाली "पुरुषोत्तमपुरी रस्त्यातील अतिक्रमण हटवा", "जायकोचीवाडी फाट्यावर बस थांबा निर्माण करा" अशा मागण्या करण्यात आल्या.
या घटना राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि प्रशासनाच्या उदासीनतेचे ज्वलंत उदाहरण आहेत. वाढत्या अपघातांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वेळेवर योग्य निर्णय आणि रस्त्यांची देखभाल न केल्यास अशा दुर्घटना पुन्हा पुन्हा घडणार, याची जाणीव प्रशासनाला करून देण्याची गरज आहे.