
NEET Paper Leak : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या कथित NEET-UG पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्रातील लातूर कनेक्शन समोर आल्यानंतर मोठी राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटू लागली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) रेणुकाई करिअर सेंटरचे संस्थापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर सोमवारी लातूरमधील RCC मुख्यालयाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि संस्थेच्या फलकांवर शाईफेक करत संताप व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रेणुकाई करिअर सेंटरच्या मुख्यालयाबाहेर जमा झाले होते. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी RCC च्या फलकांवर शाई फेकून निषेध नोंदवला. सकाळपासूनच विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा होत असल्याने पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
CBI अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लातूरच्या शिवनगर परिसरातील RCC संस्थेत छापेमारीदरम्यान मोटेगावकर यांच्या वैयक्तिक मोबाईल फोनमधून कथितरित्या फुटलेली NEET-UG प्रश्नपत्रिका आणि उत्तरसूची आढळून आली. तपास यंत्रणेने दावा केला आहे की, मोटेगावकर हे पेपरफुटी आणि प्रश्नपत्रिका प्रसारित करणाऱ्या संघटित रॅकेटचे सक्रिय सदस्य होते. विशेष म्हणजे, परीक्षा होण्याच्या सुमारे दहा दिवस आधी म्हणजेच 23 एप्रिललाच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा आरोप CBI ने केला आहे.
या प्रकरणात CBI ने मागील काही दिवसांपासून तपासाची गती वाढवली आहे. शुक्रवारी अधिकाऱ्यांनी मोटेगावकर यांची जवळपास आठ तास चौकशी केली होती. त्यानंतर रविवारी RCC मुख्य कार्यालयात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. तपास यंत्रणा आता या रॅकेटचे राज्याबाहेरील धागेदोरे आणि आर्थिक व्यवहार तपासत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, लातूरमधील काही डॉक्टरांनी कथितरित्या फुटलेली NEET प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या संदर्भातही काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात येत असून, आगामी काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET-UG परीक्षेसाठी यंदा तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 3 मे रोजी भारतातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, 7 मे रोजी कथित गैरप्रकारांचे वृत्त समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. आता 21 जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.