
पुणे: पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या राजीनाम्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.
मानकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात 'राजकीय बदनामी होत असल्याच्या त्रासाला कंटाळून' हे पद सोडत असल्याचे स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी जमीन व्यवहारातील कथित घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामुळे आपली राजकीय कारकीर्द मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
"काही वर्षांपूर्वी केलेल्या जमीन व्यवहारात, आता अचानक ३-४ दिवसांपूर्वी शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा माझ्यावर दाखल झाला आहे. हा गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर, माझी राजकीय कारकीर्द मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. या व्यवहारात माझ्याकडून कोणताही गैरप्रकार झालेला नाही.
या प्रकरणामुळे पक्षाची आणि आपली नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अजितदादा, आपण आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. तरी, माझा राजीनामा मंजूर करावा," असे मानकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
मानकर यांच्या या अनपेक्षित राजीनाम्यामुळे पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा धक्का अजित पवार यांच्यासाठी मोठा राजकीय फटका मानला जात आहे. या राजीनाम्याचे आगामी निवडणुकीवर काय परिणाम होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.