अतुल भोसलेंना भाजपकडून मोठा सन्मान! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभवानंतर आता साताऱ्याच्या भाजप संघटनेची धुरा त्यांच्या हाती

Published : May 13, 2025, 10:02 PM ISTUpdated : May 13, 2025, 10:03 PM IST
atul bhosale

सार

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करणारे आमदार अतुल भोसले यांची भाजपने सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशस्वी कामगिरी आणि संघटनात्मक कौशल्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

सातारा: कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दणदणीत पराभव करून चर्चेत आलेले आमदार अतुल बाबा भोसले यांना भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपने नुकत्याच घोषित केलेल्या राज्यातील ५८ जिल्हाध्यक्षांच्या यादीत भोसले यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांना संघटनात्मक ताकद वाढवण्याचे मोठे बळ देण्यात आले आहे.

भोसले यांची ही निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष विश्वासाची पावती मानली जात आहे. भोसले यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून यशस्वी कामगिरी केली होती, त्याच्या पार्श्वभूमीवरच ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

काँग्रेसचा गड भेदणारा, भाजपचा बळकट चेहरा

२०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वेळा अपयश आल्यानंतर, २०२४ मध्ये भोसले यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कराड दक्षिण मतदारसंघातून विजय मिळवत भाजपसाठी ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयामुळे कराडमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले.

भाजपचा संघटनात्मक चेहरा

अतुल भोसले यांचा राजकीय प्रवास विविध टप्प्यांतून समृद्ध झाला आहे:

२०१५ मध्ये भाजपचे प्रदेश चिटणीस म्हणून जबाबदारी

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष (२०१७-२०१९)

कराड नगरपालिकेत भाजपचा पहिला नगराध्यक्ष निवडून आणण्याची कामगिरी

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये भाजपला यश

प्रदेश कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र व गोवा प्रचारक म्हणून यशस्वी सहभाग

या सर्व घडामोडींनी भोसले यांना फडणवीसांचे निकटवर्तीय नेते म्हणून ओळख दिली.

जिल्हाध्यक्षपदी नेमणूक: पक्षाच्या विश्वासाची पावती

सातारा जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत असताना, पक्षश्रेष्ठींनी भोसले यांना निवडून राजकीय संदेश दिला आहे – पक्ष संघटनेची धुरा आता नव्या नेतृत्वाच्या हाती दिली जात आहे.

“साताऱ्यात भाजप नंबर वन करू”: अतुल भोसले

या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना अतुल भोसले म्हणाले “पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी अत्यंत आभारी आहे. साताऱ्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. नव्या कार्यकर्त्यांना संधी, विचारधारा घरोघरी पोहोचवणे, आणि भाजपला जिल्ह्यात अग्रस्थानी नेणे हे माझे ध्येय असेल.”

पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, संघटन कौशल्य, आणि पक्षातील दृढ निष्ठेमुळे अतुल भोसले हे साताऱ्यात भाजपचे नवे ‘फेस’ ठरले आहेत. जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांच्यावर दिलेली जबाबदारी भविष्यातील राजकीय समीकरणे ठरवणारी ठरू शकते.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

नाताळात कन्फर्म तिकीट हवंय? कोकण रेल्वेची खास भेट!, 'या' विशेष गाड्यांचं संपूर्ण वेळापत्रक पाहा!
नोकरी गेली... कॅन्सरने जीव नको नकोसा केला! पुणे कर्मचाऱ्याचं 'न्याय मिळेपर्यंत' उपोषण; प्रशासनावर मोठी नामुष्की!