
Navi Mumbai Viral Video : नवी मुंबईतील वाशी रुग्णालयात एका 23 वर्षीय तरुणीच्या मृतदेहासाठी कापड नीट गुंडाळून देण्याच्या बदल्यात शवागृहातील कर्मचाऱ्याने दोन हजार रुपयांची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ही धक्कादायक घटना नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील आहे. प्रख्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. ऐरोली परिसरातील एका पेईंग गेस्ट रूममध्ये राहणाऱ्या या मुलीने रविवारी पहाटे स्वतःचे आयुष्य संपवले. मुळची ही तरुणी कानपूरची असून, आत्महत्येनंतर तिचे आई-वडील नवी मुंबईत दाखल झाले. आपल्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो मुळ गावी घेऊन जाण्यासाठी ते वाशी रुग्णालयात आले.
मात्र, मृतदेह ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान शवागृहातील कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासणारी वागणूक दिली. "कपडा नीट गुंडाळून देतो," असे सांगत कर्मचाऱ्याने आधी एक हजार रुपयांची मागणी केली. नंतर अधिक पैसे मिळतील याची खात्री पटल्यावर त्याने दोन हजार रुपयांची लाच मागितली आणि घेतलीसुद्धा. हे सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाले असून, याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.
या लाजीरवाण्या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासन आणि नवी मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठली आहे. मृत तरुणीच्या नातेवाईकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत संबंधित कर्मचाऱ्यांवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आजवर अशा घटनांबाबत फक्त ऐकिवात होते, मात्र यावेळी प्रत्यक्ष व्हिडीओ पुराव्याद्वारे माणुसकीची गळचेपी स्पष्टपणे समोर आली आहे. रुग्णालयांमध्ये सेवा ही सामाजिक बांधिलकी समजून दिली गेली पाहिजे, मात्र येथे मृतांच्या नातेवाईकांकडूनही पैसे उकळले जात असल्याचा हा प्रकार अत्यंत लज्जास्पद आणि गंभीर आहे. प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे.