
बुलढाणा: गेल्या काही काळापासून बुलढाणा जिल्हा अजब आणि चिंताजनक आरोग्य समस्यांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. आधी डोक्यावरील केस झपाट्याने गळण्याची घटना समोर आली, त्यानंतर नख गळतीचा प्रकार चर्चेत आला, आणि आता याच जिल्ह्यातील शेलगाव देशमुख या गावात नागरिकांच्या हातांना खोल भेगा पडण्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या नव्या आजारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने तातडीने पथक गावात पाठवले. मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील सुमारे २० रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्वचाविकाराची लक्षणे आढळून आली असून, बहुतांश रुग्ण 'इसबगोल' या ऑटोइम्यून त्वचाविकाराने त्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
या तपासणीत सहभागी त्वचारोग तज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रट आणि जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी सांगितले की, हा आजार संसर्गजन्य नाही. पाण्याचा किंवा अन्नपदार्थांशी त्याचा थेट संबंध नाही. प्रत्यक्षात, ही अवस्था शरीराच्या प्रतिकारशक्तीतील बिघाडामुळे (Autoimmune Disorder) उद्भवते. विविध हानिकारक रसायनांच्या संपर्कामुळे शरीर स्वतःच्या पेशींवरच हल्ला करते आणि त्वचेला हानी पोहोचते.
विशेष म्हणजे, या रुग्णांमध्ये हा त्रास काही महिन्यांपासून नव्हे, तर मागील १ ते ५ वर्षांपासून सुरु असल्याचे आढळून आले आहे. काही रुग्णांवर अकोला व बुलढाण्यातील खासगी त्वचारोग तज्ज्ञांकडून उपचार सुरू असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
हा प्रकार केंद्रीय आरोग्य आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघातील असल्याने प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने रुग्णांची सखोल तपासणी सुरू केली असून, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात समोर येणाऱ्या या आरोग्य समस्यांमुळे प्रशासन आणि नागरिक दोघेही अलर्ट मोडवर आले आहेत. या नव्या आरोग्य संकटावर मात करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, वैद्यकीय सल्ल्याचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.