
Navi Mumbai : नवी मुंबईत गेल्या महिन्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या एसी बसमध्ये मागच्या सीटवर एका कपलने सार्वजनिक ठिकाणी शरीरसंबंध ठेवले. हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पाहिला आणि मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी संबंधित कपलची ओळख पटवली. या प्रकारानंतर नवी मुंबई महापालिकेच्या वाहतूक शाखेने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी संबंधित जोडप्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) कलम २९६ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११० आणि ११७ अंतर्गत एफआयआर नोंदवला. न्यायालयात कपलने पश्चात्ताप व्यक्त केला आणि त्यानंतर कोर्टाने प्रत्येकी २००० रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला.
या घटनेदरम्यान बसमधील कंडक्टर पुढील बाजूस प्रवाशांसोबत बसलेला होता. त्याने ही घटना लक्षात न घेतल्यामुळे महापालिकेने त्याच्यावर निष्काळजीपणाची कारवाई करत निलंबित केले. मात्र, काही दिवसांनी त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले.
बाइकस्वाराने शूट केला होता व्हिडीओ
ही घटना २० एप्रिल रोजी रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. पनवेलहून कल्याणकडे जाणाऱ्या एसी बसमध्ये मागील सीटवर कपलने अश्लील कृत्य केले. रस्त्यावरून जात असलेल्या एका बाइकस्वाराने संपूर्ण प्रकार पाहून मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तोच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत जोडप्याला अटक केली. अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने बसमधील सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.