महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत देऊ केली जाते. याचा लाभ कसा घ्यायचा, पात्रता काय आणि संपूर्ण अर्जप्रक्रिया सविस्तर जाणून घ्या.
कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवते. अशा परिस्थितीत गरीब कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळते. या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि अर्ज कुठे करायचा, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
28
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेला मुख्य उद्देश
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राबवली जाते. कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्या व्यक्तीच्या उत्पन्नावर प्रामुख्याने अवलंबून होता, अशा प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो. मुख्यत्वे दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना अशा कठीण प्रसंगी आर्थिक मदत मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
38
योजनेअंतर्गत किती आर्थिक मदत मिळते?
या योजनेंतर्गत पात्र कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांचे आर्थिक मदत केली जाते. कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी ही मदत फायदेशीर ठरू शकते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार आणि संबंधित कुटुंबाने शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
1. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2. अर्जदार हा मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य किंवा तिच्यावर अवलंबून असलेला व्यक्ती असावा.
3. संबंधित कुटुंब दारिद्र्यरेषेखालील (BPL) असणे आवश्यक आहे.
4. मृत्यू झालेल्या कुटुंबप्रमुखाचे वय मृत्यूसमयी १८ ते ५९ वर्षांच्या दरम्यान असावे.
5. मृत व्यक्ती ही कुटुंबातील प्रमुख कमावती व्यक्ती असणे आवश्यक आहे.
58
अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
1. अर्जदाराचे ओळखपत्र – आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र.
2. मृत व्यक्तीचे ओळखपत्र – आधार कार्ड.
3. मृत्यूचा दाखला.
4. एफआयआरची प्रत (FIR Copy).
5. मृत व्यक्तीच्या वयाचा पुरावा.
6. दारिद्र्यरेषेखालील (BPL) प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड.
7. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास).
8. रहिवासी किंवा पत्त्याचा पुरावा.
9. बँक पासबुक किंवा बँक खात्याचा तपशील.
10. संबंधित अधिकाऱ्यांनी मागितलेली इतर आवश्यक कागदपत्रे.
68
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी अर्ज कसा करावा?
अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
अर्ज घ्या
इच्छुक अर्जदाराने कार्यालयीन वेळेत आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालय येथे भेट द्यावी. संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनेसंबंधित अर्ज घ्यावा.
अर्ज व्यवस्थित भरा
अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरावी. आवश्यक असल्यास पासपोर्ट आकाराचा फोटो लावावा. तसेच मागितलेल्या कागदपत्रांच्या प्रती स्वसाक्षांकित करून अर्जासोबत जोडाव्यात.
अर्ज जमा करा
संपूर्ण भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात जमा करावा. अर्ज सादर करण्यासाठी कोणतीही दिलेल्या मुदतीचे पालन करावे.
अर्ज स्विकारल्याची पावती घ्या
अर्ज जमा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून अर्ज स्वीकारल्याची पावती घ्यावी. या पावतीवर अर्ज जमा केल्याची तारीख, वेळ आणि अर्जाचा विशिष्ट ओळख क्रमांक (असल्यास) नमूद असल्याची खात्री करावी.
78
कोणाला मिळणार योजनेचा लाभ?
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य किंवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात. पात्रता पूर्ण करणाऱ्या कुटुंबाला २० हजार रुपयांचे एकरकमी आर्थिक सहाय्य मिळते.
88
मृत व्यक्तीचे वय किती असणे आवश्यक आहे?
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी मृत्यू झालेल्या प्रमुख कमावत्या व्यक्तीचे वय मृत्यूच्या वेळी किमान १८ वर्षे आणि अधिकाधिक ५९ वर्षे असणे आवश्यक आहे.
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.