Nasrapur Case Verdict : 'हा न्यायाचा विजय'; नसरापूर प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Published : Jun 29, 2026, 05:28 PM IST
Nasrapur Case Verdict

सार

Nasrapur Case Verdict : नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. 

Nasrapur Case Verdict : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या प्रकरणातील आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत तपास, आरोपपत्र, सुनावणी आणि निकाल पूर्ण झाल्याने हा खटला राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगाने निकाली निघालेल्या प्रकरणांपैकी एक ठरला आहे.

न्यायालयाचा कठोर निर्णय

शिक्षा सुनावताना विशेष न्यायाधीशांनी हे प्रकरण 'रेअरेस्ट ऑफ रेअर' असल्याचे स्पष्ट केले. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. शवविच्छेदन अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांमुळे आरोपीविरोधातील सर्व आरोप सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. आरोपीने चिमुकलीला जगण्याची कोणतीही संधी दिली नाही आणि गुन्हा अत्यंत क्रूर स्वरूपाचा असल्याने तो मृत्युदंडास पात्र असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की, या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. अशा नराधमांना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. याशिवाय फडवणीस यांनी पुणे ग्रामीण पोलिस, सरकारी वकील अजय मिसर आणि तपास यंत्रणांचे विशेष अभिनंदन केले. विक्रमी वेळेत तपास पूर्ण करून पीडितेला न्याय मिळवून देणे ही मोठी कामगिरी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

 

 सरकारी पक्षाचा युक्तिवाद ठरला निर्णायक

सरकारी पक्षाचे विशेष वकील अजय मिसर यांनी आरोपीला केवळ फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी न्यायालयाकडे केली होती. आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी त्याने केलेला गुन्हा अत्यंत अमानुष असून त्याच्यात सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीलाच "तुला कोणती शिक्षा द्यावी?" असा प्रश्न विचारला होता. मात्र आरोपीने मौन बाळगले आणि नंतर पुन्हा खोटी कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने त्याचा बचाव फेटाळून लावत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

शिर्डीतून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा; 'खुर्चीचं रक्षण कर' म्हणत लगावला टोला
Nasrapur Case : अखेर न्याय मिळाला! नसरापूरच्या चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला फाशी