
Maharashtra Rain Alert : दिवाळी जवळ येत असताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसाने पुन्हा संकट निर्माण केलं आहे. हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे, सातारा, अहमदनगरसह एकूण 15 जिल्ह्यांना 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी यलो अलर्टचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. काहींची शेती वाहून गेली, तर काहींचं तयार पीक पाण्यात भिजून वाया गेलं.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. सोयाबीनची काढणी सुरू असताना अचानक पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे सोयाबीन भिजत असून, गंजी झाकण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. शेतात फुटलेला कापूस ओला झाल्याने आणखी नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच अतिवृष्टीमुळे त्रस्त असलेले शेतकरी आता पुन्हा नव्या संकटाला सामोरे जात आहेत.
धाराशिवमध्ये महापुरामुळे शेकडो एकर जमीन वाहून गेली आहे. विशेषतः नदीकाठच्या भागात मातीच शिल्लक राहिली नाही. यामुळे त्या ठिकाणी "पाण्यावर शेती" करण्याचा नवा प्रयोग सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. या नव्या "धाराशिव पॅटर्न" अंतर्गत पाण्यावर शेती करण्याची शक्यता तपासली जाणार असून, महिनाभरात याबाबतचा अहवाल तयार केला जाईल. या शेतीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, काढणीस तयार असलेले सोयाबीन तात्काळ काढून सुरक्षित ठिकाणी साठवावे. वाळल्यानंतरच मळणी करावी. तसेच, भाजीपाला, फळबाग आणि फुल पिकांमध्ये पाणी साचू नये याची विशेष काळजी घ्यावी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा तातडीने करावा.
राज्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बळीराजा पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीसमोर उभा ठाकला आहे. नुकसानीतून सावरण्याआधीच पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. प्रशासनाने सतर्कता ठेवण्याचे आवाहन केले असून, शेतकऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.