
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 'ब' वर्गातून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे. कारखाना क्षेत्रातला हा निकाल केवळ एक निवडणूक नसून, अजित पवारांच्या सहकारी राजकारणातील वर्चस्वाचा ठळक पुरावा ठरतो आहे.
मतमोजणी बारामतीच्या प्रशासकीय भवनात पार पडत असताना, सुरुवातीपासूनच 'ब' वर्गात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने आघाडी घेतली होती. एकूण 101 मतांपैकी तब्बल 91 मते अजित पवार यांच्या पारड्यात पडली, तर विरोधी सहकार बचाव पॅनेलला केवळ 10 मते मिळाली. या भव्य विजयामुळे पवार समर्थकांनी जल्लोषात एकमेकांचे अभिनंदन करत उत्सव साजरा केला.
या निवडणुकीत अजित पवार व विरोधी तडाखेबाज नेता चंद्रराव तावरे यांच्यात रंगलेली जुगलबंदी विशेष चर्चेचा विषय ठरली. दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी केली, आरोपांचे टोले लगावले गेले, मात्र पवार व तावरे यांनी वैयक्तिक टीका टाळून निवडणुकीला एक परिपक्व रंग दिला.
अजित पवारांनी निवडणुकीपूर्वीच विरोधकांना खुले आव्हान दिले होते. "आमच्या पॅनलचा मीच चेअरमन असेल, तुमचा उमेदवार जाहीर करा!" याला उत्तर देताना सहकार बचाव पॅनेलने तावरे यांना चेअरमन पदासाठी घोषित करत आव्हान स्विकारले होते.
माळेगाव कारखान्याची निवडणूक ही केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचे लक्ष या लढतीकडे लागले होते. अजित पवारांनी स्वतः या रिंगणात उतरून या निवडणुकीला प्रतिष्ठेची लढत बनवले. 'ब' वर्गातील विजयानंतर आता 'अ', 'क', व 'ड' वर्गातील निकालांवरही उत्सुकतेचे वातावरण आहे.
या निकालाने अजित पवारांच्या सहकारी क्षेत्रातील दबदब्याला अधिक बळ मिळाले असून, विरोधकांच्या रणनीतीला मोठा धक्का बसला आहे. आगामी राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होणार हे नक्की!