नाशिक-अक्कलकोट ग्रीनफील्ड महामार्गाचा मार्ग मोकळा! ३० गावांतील जमिनींच्या संपादनाला वेग; पाहा संपूर्ण यादी

Published : Feb 25, 2026, 09:51 PM IST
Nashik-Akkalkot Greenfield Highway project

सार

उत्तर व दक्षिण महाराष्ट्राला जोडणाऱ्या नाशिक-अक्कलकोट ग्रीनफील्ड महामार्गाच्या जमीन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सूरत-नाशिक टप्पा रद्द झाल्याने आता हा महामार्ग नाशिकपासून सुरू होणार असून, पुढील २ वर्षांत तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

नाशिक: उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'नाशिक-अक्कलकोट ग्रीनफील्ड महामार्गा'बाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कंबर कसली असून, जमीन संपादनाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील दोन वर्षांत हा महामार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जमीन संपादनासाठी 'डेडलाईन' जाहीर

नाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड आणि सिन्नर या तीन तालुक्यांतील उर्वरित १०७.३३ हेक्टर जमिनीच्या संपादनासाठी प्रशासनाने हालचाली तीव्र केल्या आहेत. बाधित शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या हरकती व सूचना मांडण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामाला मोठी गती मिळणार आहे.

सूरत-चेन्नई नाही, आता नाशिकपासून श्रीगणेशा!

सुरुवातीला हा मार्ग सूरत ते चेन्नई असा प्रस्तावित होता. मात्र, तांत्रिक अडचणी आणि विरोधामुळे सूरत-नाशिक टप्पा रद्द झाला आहे. आता हा महामार्ग नाशिकच्या आडगाव येथून सुरू होईल आणि अहिल्यानगर (अहमदनगर), धाराशिव, सोलापूरमार्गे थेट अक्कलकोटपर्यंत धावेल.

तुमच्या गावातून जाणार का महामार्ग? ही आहे यादी

नाशिक जिल्ह्यातील एकूण ३० गावांमधून हा हायवे जाणार आहे. तालुकानिहाय गावांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

तालुका बाधित गावे

नाशिक आडगाव, विंचूरगवळी

निफाड दारणासांगवी, सावळी, चाटोरी, चेहडी, हेदारणा, लालपाडी, रामनगर, पिंपळगाव निपाणी, तळवाले

सिन्नर देशवंडी, पाटपिंपरी, बारनाव पिंपरी, निमगाव सिन्नर, गुळवंच, देवपूर, खोपडी, फर्दापूर, धारणगाव, भोकणी, पांगरी, फुलेनगर, वावी, थोडेवाडी, कहांडलवाडी

कसा असेल हा 'सुपरफास्ट' महामार्ग? (ठळक वैशिष्ट्ये)

एकूण लांबी: ३७४ किलोमीटर (नाशिक ते अक्कलकोट).

रुंदी: १५२ किमीचा रस्ता ७० मीटर, तर २२२ किमीचा रस्ता ६० मीटर रुंद असेल.

दऱ्याखोऱ्यांतील प्रवास: विशेष ५.६ किमीचा मार्ग दऱ्यांमधून जाणार आहे.

पायाभूत सुविधा: २७ मोठे पूल, १६४ लहान पूल आणि अनेक जोडरस्ते.

फायदा काय?

हा महामार्ग पूर्ण झाल्यावर उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्र एकमेकांच्या जवळ येतील. विशेषतः अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांचा वेळ वाचेल. तसेच औद्योगिक वाहतूक आणि शेतीमालाची ने-आण जलद गतीने होऊन वाहतूक खर्च निम्म्यावर येण्याची शक्यता आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Konkan Railway: कोकणचा प्रवास होणार आणखी सुखकर! कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसमध्ये मोठा बदल; वेटिंग लिस्टचं टेन्शन मिटणार!
पुणेकरांच्या घशाला उन्हाळ्यापूर्वीच कोरड! वानवडीत पाणी कपातीचा 'शॉक'; पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू