
Nagpur : बारावीच्या परीक्षेसाठी अहोरात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणारी धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. विज्ञान शाखेतील अत्यंत महत्त्वाच्या फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या अवघ्या तासाभरापूर्वी व्हॉट्सॲपवर प्रसारित झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खासगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाचा संशयित सहभाग समोर आला आहे.
ही घटना नागपूरच्या सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर घडली. गुरुवारी केमिस्ट्रीचा पेपर सुरू असताना एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात असल्याने पर्यवेक्षकांना संशय आला.महिला शिक्षिकेमार्फत तपासणी केल्यावर तिच्याकडून स्मार्टफोन जप्त करण्यात आला. मोबाईल तपासल्यावर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये परीक्षेपूर्वीच संपूर्ण प्रश्नपत्रिका शेअर झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस तपासात समोर आले की, १५ विद्यार्थ्यांचा स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला होता. पकडलेल्या विद्यार्थिनीने चौकशीत शहरातील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाने पैशांच्या मोबदल्यात पेपर पुरवल्याची माहिती दिली.या ग्रुपमधील इतर १३ विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर पेपर सोडवत असल्याचेही समोर आले आहे.
केंद्रप्रमुखांनी तातडीने सदर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संबंधित विद्यार्थिनीचा मोबाईल जप्त केला असून संशयित शिक्षकाचा शोध सुरू आहे. पेपर लीक साखळीचा उलगडा करण्यासाठी तांत्रिक तपासही सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे परीक्षा प्रक्रियेच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शिक्षण विभागाकडूनही स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता आहे.