
Municipal Elections 2025 : राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी जलद हालचाली सुरू केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 15 ते 20 डिसेंबरदरम्यान निवडणूक आयोग आगामी निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करू शकतो. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे आरक्षण प्रकरण मोठे असल्याने, 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आधी होण्याची अधिक शक्यता असल्याचे समजते.
राज्यातील 20 जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने मोठा कायदेशीर अडथळा निर्माण झाला आहे. त्याउलट 29 महानगरपालिकांपैकी फक्त चंद्रपूर आणि नागपूर येथेच आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या तुलनेत मनपा निवडणुका घेणे सध्या आयोगाला जास्त सोयीस्कर वाटत आहे. त्यामुळेच 4 नोव्हेंबर रोजी 29 मनपांच्या आयुक्तांची बैठक बोलावण्यात आली असून, मनपा निवडणुकांची तयारी कितपत झाली, याचा आढावा घेतला जाणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात आलेल्या हरकती, अडचणी आणि तांत्रिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आज महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीस मुंबई महापालिकेचे आयुक्त उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसांपूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोगाने बैठक घेतली होती. पक्षांकडून आलेल्या विविध हरकती आणि सूचनांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अधिक महत्त्वाची मानली जात आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर आतापर्यंत 7452 हरकती-सूचना दाखल झाल्या आहेत. केवळ एका दिवसातच 1958 हरकती नोंदविण्यात आल्या. 3 डिसेंबर हा हरकती नोंद करण्याचा शेवटचा दिवस होता. आता निवडणूक आयोग 10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर** करणार आहे. वाढत्या हरकती पाहता मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा चर्चेत आल्या आहेत.