Mumbai-Goa Highway : काम अपूर्ण असतानाच टोल वसुलीचा घाट; मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल पुन्हा चर्चेत

Published : Apr 23, 2026, 11:28 AM IST
Mumbai-Goa Highway

सार

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असतानाच ओसरगाव टोल नाक्यावर पुन्हा वसुली सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. NHAI ने निविदा काढल्या असून स्थानिक वाहनांना सूट नसल्याने पुन्हा आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे.

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाच सिंधुदुर्गातील वाहनधारकांसाठी चिंताजनक घडामोड समोर आली आहे. ओसरगाव टोल नाक्यावरून पुन्हा पथकर वसुली सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कामासाठी मेअखेरची मुदत दिली असताना, त्याआधीच टोल वसुलीचा निर्णय चर्चेत आला आहे.

नव्या निविदा प्रक्रियेला सुरुवात

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून ओसरगाव टोल नाक्यासाठी ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 24 एप्रिल रोजी ठेकेदार निश्चित होणार असून, त्यानंतर टोल वसुली सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या निर्णयामुळे अपूर्ण कामावर टोल आकारण्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थानिकांना सूट नसल्याने नाराजी

या नव्या निविदेमध्ये स्थानिक वाहनांना टोलमधून पूर्ण सूट देण्याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे सिंधुदुर्गातील नागरिक आणि स्थानिक वाहनधारकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

60 किमी मार्गावर टोल आकारणी

जानवली पूल ते पत्रादेवी या सुमारे 60 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी टोल वसुली केली जाणार आहे. महामार्ग विभागाच्या अंदाजानुसार, या मार्गावरून दरवर्षी सुमारे 57.88 कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो. या मार्गावर सर्वाधिक प्रमाणात कार आणि जीपसारख्या हलक्या वाहनांची वाहतूक (49%) असल्याचेही समोर आले आहे.

2023 च्या आंदोलनाची पार्श्वभूमी

ओसरगाव टोल नाक्यावर यापूर्वी 14 जून 2023 रोजी वसुली सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, स्थानिकांच्या तीव्र आंदोलनामुळे हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. गेली तीन वर्षे टोल नाका बंद होता. आता पुन्हा त्याच ठिकाणी वसुली सुरू करण्याच्या हालचालींमुळे संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.

प्रस्तावित टोल दर (अंदाजे):

  • कार, जीप, व्हॅन: ₹125 (एकेरी) / ₹190 (परतीचा) / ₹65 (स्थानिक)
  • मिनी बस, हलकी वाहने: ₹200 / ₹305 / ₹100
  • बस, ट्रक (दोन अक्सल): ₹425 / ₹635 / ₹210
  • अवजड वाहने: ₹665 / ₹995 / ₹330

PREV
Read more Articles on

Recommended Stories

पुण्यात झाला गारांचा पाऊस, मनाली-स्वित्झर्लंडचा नागरिकांनी घरी बसून घेतला आनंद
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : 10 जागांसाठी रणधुमाळी, महायुतीचा वरचष्मा; उमेदवारांची नावे चर्चेत