
मुंबई: दक्षिण मुंबईपासून ते दहिसरपर्यंतचा प्रवास लवकरच अधिक जलद, सुलभ आणि सुसाट होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा रस्ता (Coastal Road) प्रकल्पातील उर्वरित तीन आंतरमार्गिका मे महिन्यात टप्प्याटप्याने खुल्या होणार असून, त्यानंतर संपूर्ण १८ मार्गिका वाहनचालकांच्या सेवेत असतील.
नुकतीच हाजी अली ज्यूस सेंटर ते मरिन ड्राइव्हदरम्यानची १५वी आंतरमार्गिका खुली करण्यात आली. उर्वरित तीन मार्गिका –
बडोदा पॅलेस ते लोटस जेट्टी,
जे.के. कपूर चौक ते मरिन ड्राइव्ह,
जे.के. कपूर चौक ते वांद्रे-वरळी सी लिंक
या मे महिन्यात एकामागोमाग एक टप्प्याटप्याने सुरू होणार आहेत.
यामुळे नागरिकांना वरळी, हाजी अली, वांद्रे यांसारख्या महत्त्वाच्या भागांमधून थेट सागरी मार्गावर सहज प्रवेश मिळेल. सर्व १८ मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर कोस्टल रोडचा अनुभव अधिक गतीशिल व अखंड होणार आहे.
मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे उद्दिष्टच आहे. दक्षिण मुंबईपासून उत्तरेकडे जलद प्रवास. या प्रकल्पाचा पहिला टप्पा प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून ते वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंत आहे. एकूण १०.५८ किमी लांबीच्या या मार्गावर मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ५० लाखांहून अधिक वाहने धावली आहेत. दररोज सरासरी २०,००० हून अधिक वाहने या मार्गाचा वापर करत आहेत. सध्या हा मार्ग दररोज सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत खुला आहे, ज्यामुळे कार्यालयीन वेळात प्रचंड वाहतूक कमी होण्यास मदत झाली आहे.
सध्या या मार्गावर वाहनांच्या अतिवेगावर थेट नजर ठेवण्यासाठी कोणतेही कॅमेरे नाहीत. त्यामुळे काही चालक हे रस्ता मोकळा मिळाल्याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी मुंबई महापालिका व वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी ठरवलेल्या २८ कॅमेर्यांच्या तुलनेत ही संख्या आता कमी करण्यात येणार आहे, पण नेमके आणि प्रभावी पद्धतीने या कॅमेऱ्यांचे नियोजन होणार असल्याचे संकेत आहेत.
कोस्टल रोडच्या सर्व मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक होईल. नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत ‘सुसाट सफर’ हे स्वप्न लवकरच वास्तवात उतरणार आहे.