
Eknath Shinde: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मिशन महापालिका' सुरू करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जोरदार हादरा दिला आहे. कोकणापासून ते ठाणे, नवी मुंबई आणि अगदी मुंबईपर्यंत अनेक माजी नगरसेवक आणि शाखा प्रमुखांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ठाणे शहरात शिवसेना (उबाठा) पक्षातील नौपाडा विभागाचे उपविभागप्रमुख प्रितम राजपूत, राजेश पवार, गटप्रमुख सुधीर ठाकूर आणि शाखाप्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह तब्बल २० पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदेंनी जोरदार हल्लाबोल करत सांगितले, “अडीच वर्षांतील महायुतीच्या कामगिरीवर जनतेचा विश्वास बसला आहे. विधानसभेनंतर महापालिकांवरही भगवा झेंडा फडकणारच.”
मुंबई महानगरपालिकेतील माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे मुंबईतही उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे ४५ ते ५० माजी नगरसेवकांनी ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे गटात सामील झाल्याचा दावा खुद्द शिंदेंनी केला आहे.
नवी मुंबईत देखील ठाकरे गटाचे वर्चस्व डळमळीत होऊ लागले आहे. विधानसभेनंतर माजी नगरसेवकांमध्ये असलेली नाराजी आता उघड होत असून १३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये ठाकरे गटासह इतर पक्षातील माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. परिणामी, नवी मुंबईत शिंदेंचे बळ अधिक मजबूत झाले आहे.
एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, हा पक्षप्रवेश केवळ व्यक्तिकेंद्रित नाही, तर ही 'मिशन महापालिका' ची सुरूवात आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी आगामी स्थानिक निवडणुका हे मोठं आव्हान ठरणार यात शंका नाही.