
जळगाव जामोद, बुलढाणा: महाराष्ट्राच्या पारंपरिक आणि श्रद्धास्थानी मानल्या जाणाऱ्या भेंडवळ घटमांडणीचे भविष्यवाणीचे वाचन एक मे रोजी पहाटे सहा वाजता पार पडले. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी या पूजनीय घटातील सूचनांच्या आधारे यावर्षीच्या सामाजिक, आर्थिक व हवामानविषयक परिस्थितीचे भाकीत जाहीर केले.
घटातील मसूर धान्य थोड्या प्रमाणात दबलेले आढळल्याने शत्रूंच्या कारवाया वर्षभर सुरूच राहतील, असा संकेत मिळाला आहे. मात्र, करडी धान्य साबूत असल्याने देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम राहील. त्यामुळे कोणताही परकीय देश देशाला वाकडे करू शकणार नाही. तरीही, देशाच्या नेतृत्वावर म्हणजेच ‘राजा’वर मोठा मानसिक ताण राहील असे भाकीत वर्तवण्यात आले.
भविष्यवाणीमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हवामान व पावसाळ्याचा अंदाज. यावर्षी जूनमध्ये पावसाची सुरुवात साधारण स्वरूपात होईल, जुलैमध्ये त्यात वाढ होईल, ऑगस्टमध्ये पाऊस स्थिर राहील तर सप्टेंबरमध्ये जोरदार आणि अवकाळी पावसाचे प्रमाण अधिक राहील. यामुळे काही भागांत नैसर्गिक आपत्तींची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, अवकाळी पावसाचे थैमान राहिल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून काही ठिकाणी रोगराईसुद्धा पसरेल, असा इशारा यामधून मिळतो. तरीही पिकांची परिस्थिती सर्वसाधारण राहील, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वर्ष ना खूप चांगले, ना खूप वाईट असा ‘मध्यममार्गी’ ठरेल.
पिक भविष्य
कापूस सर्वसाधारण
ज्वारी चांगले, विशेषतः भावात
सोयाबीन चांगले
तूर साधारण
मूग, उडीद सर्वसाधारण
तीळ चांगले
बाजरी उत्तम
तांदूळ साधारण, पण भावात तेजी
हरभरा साधारण, किंचित भाव घसतील
लाख साधारण, परंतु भाववाढ
भादली रोगराई अधिक
घटातील करव्या वरील पुरी गायब असल्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. याचा अर्थ पृथ्वीवर मोठ्या स्वरूपाचे संकट कोसळू शकते. यामध्ये युद्धजन्य परिस्थिती असो किंवा नैसर्गिक आपत्ती धोका टळलेला नाही.
या पारंपरिक व श्रद्धेच्या घटमांडणीसाठी विदर्भातील अनेक शेतकरी रात्रीपासूनच मुक्कामी होते. पहाटेपासूनच भेंडवळ परिसरात गर्दी झाली होती. या अनोख्या भविष्यवाणीचा विश्वास शेतकऱ्यांना आजही आहे, कारण ही परंपरा केवळ आध्यात्मिक नसून, निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणातून साकारलेली एक पारंपरिक विज्ञानशास्त्राची शाखा मानली जाते.
यंदाचे वर्ष पावसाने भरलेले असेल, काही भागांत अवकाळी संकटे येतील, देशाची सुरक्षा भक्कम राहील पण आर्थिक आव्हाने गहिरी असतील. शेतकऱ्यांसाठी हे वर्ष ‘सर्वसाधारण’ राहील. मात्र, निसर्गाचे बदलते रूप आणि पिकांवर येणारी संकटे लक्षात घेता सावध राहण्याची गरज आहे.