भाजपाच्या विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर, भावजयीकडून परिवारावर गंभीर आरोप

Published : May 28, 2025, 02:38 PM IST
Priya Fuke

सार

भाजपाच्या विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आला आहे. खरंतर, भावजय प्रिया फुके हिने कुटुंबावर काही गंभीर आरोप केले आहेत. 

MLA Priya Fuke :  भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या घरातील कौटुंबिक वाद आता सार्वजनिकरित्या चर्चेचा विषय ठरत आहे. परिणय फुके यांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती, की त्यांची सून प्रिया फुके (संकेत फुके यांच्या पत्नी) नातवंडांना भेटू देत नाही आणि त्याबदल्यात पैशांची मागणी करते. या तक्रारीवर सुरुवातीला प्रिया फुके यांनी कोणतंही उत्तर दिलं नव्हतं, मात्र आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सासरकडील मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.

सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांनी दिला पाठिंबा

आज शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रोहिणी खडसे यांनी प्रिया फुके यांची भेट घेत त्यांना धीर दिला. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत प्रिया फुके यांनी अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या. प्रिया फुके म्हणाल्या, “मी गेल्या दीड वर्षांपासून न्यायासाठी लढतेय. पोलीस ठाण्याचे फेरे मारले, मुख्यमंत्री आणि राज्यातील अनेक राजकीय नेत्यांकडे मदतीसाठी गेले. पण कोणीही मदतीला आलं नाही. मात्र, आज या दोन बहिणी (सुषमा आणि रोहिणी) माझ्यासोबत आहेत.”

“लग्नाआधी माहिती न देता फसवणूक केली” – प्रिया फुके

प्रिया फुके यांनी सांगितलं की, २०१२ मध्ये त्यांचं संकेत फुके यांच्यासोबत लग्न झालं होतं. मात्र, त्यांच्या पतीचं २०२२ मध्ये निधन झालं. त्या म्हणाल्या, “लग्नाच्या दोन वर्षांपूर्वीच संकेत फुके यांच्यावर किडनी प्रत्यारोपण झालं होतं, परंतु आम्हाला ही माहिती दिली गेली नव्हती. लग्नानंतर जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा मी विचारलं, तर मला धमकावण्यात आलं. ‘बाहेर सांगितलंस तर तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका’ अशी धमकी मिळाली.”

बलात्काराच्या धमक्यांपासून घराबाहेर काढण्यापर्यंत छळ

प्रिया फुके पुढे म्हणाल्या की, “माझ्यावर अनेक प्रकारे मानसिक आणि भावनिक अत्याचार करण्यात आले. बलात्कार करण्यासाठी माणसं पाठवू अशी धमकीदेखील देण्यात आली.” संकेत फुके यांच्या निधनानंतरही हा त्रास थांबला नाही. संपत्तीवरून वाद निर्माण झाले आणि एका रात्री १०:३० वाजता मला घराबाहेर काढण्यात आलं. आजही माझ्या मागावर माणसं पाठवली जातात. जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत.”

रोहिणी खडसे आणि सुषमा अंधारे यांची न्यायाची मागणी

या पत्रकार परिषदेत रोहिणी खडसे म्हणाल्या, “मी सरकारला आवाहन करते की, त्यांनी प्रिया फुके यांना न्याय मिळवून द्यावा. ती आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी झगडतेय. जर महिला आयोगाने वेळीच मदत केली असती, तर आज हे प्रकरण इतकं वाढलं नसतं.” सुषमा अंधारे यांनीही न्याय मिळावा अशी मागणी केली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील कोंडीला ब्रेक, मीरा-भाईंदरमध्ये नवे वाहतूक नियोजन; 15 डिसेंबरपासून अंमलबजावणी
महाराष्ट्राला गतिमानता! पुणे-मुंबई दीड तासात, संभाजीनगरसाठी नवा एक्स्प्रेसवे; नितीन गडकरींची मोठी घोषणा