
आमदार गोपीचंद पडळकर हे कायमच वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा कोणाचंही नाव न घेता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. 'एक घर पुण्यातलं आहे, ते मटण खाऊन दगडूशेठला जातात, त्यांची सासू ख्रिश्चन आहे, नवरा कोण ब्राह्मण आहे आणि बाप मराठा आहे' असं वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केल्यामुळे परत एकदा वादाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सांगलीतील ऋतुजा पाटील प्रकरणी गोपीचंद पडळकर यांनी मोर्चा काढला होता. हा मोर्चा संपल्यानंतर मत व्यक्त करताना पडळकर यांनी हे विधान व्यक्त केलं आहे. हिंदूला मोर्चा काढण्याची गरज पडतेय कारण हिंदू संविधान मानणारा आहे. एक घर पुण्यातील आहे ते मटण खाऊन दगडूशेठला जातात त्यांची सासू ख्रिश्चन आहे, नवरा कोण ब्राह्मण आहे आणि बाप मराठा आहे. असं ते कॉकटेल कुटुंब आहे, येथून पुढे देवाबाबत तुम्ही काय बोलला तर तुम्हाला ठोकणार म्हणजे ठोकणार. मी ऑल इन वन आहे, असं वादग्रस्त विधान पडळकर यांनी केलं आहे.
'धर्मांतरण विरोधी कायदा येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. तुम्ही धर्मांतरण करतायत तर सांगा ना. तसे दाखले घ्या. जेवढे धर्मांतरीत झालेत त्यांना सगळ्यांना कोर्टाच्या आदेशानुसार नोकरीवरून काढायचं आहे.' असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. कायमच वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारे गोपीचंद पडळकर आता परत एकदा वादात पडणार असल्याचं या वक्तव्यावरून दिसून आलं आहे.
पुणे जिल्ह्याजवळील ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या एका गावाचे नाव “छत्रा निजामपूर” आहे, ज्याबद्दल पडळकर म्हणाले की, निजामच्या नावामुळे किल्ल्याच्या पवित्र इतिहासाचा अपमान होतो. त्यांनी या गावाचे नाव “रायगडवाडी” करण्याची मागणी केली, यावर त्यांनी गावाचा इतिहास जपला जाईल असं यामागे कारण दिलं होतं.
पडळकरांनी सांगलीतील ऋतुजा राजगे आत्महत्या प्रकरणावर भाष्य करत ख्रिश्चन धर्मगुरूंना लक्ष्य करत वादग्रस्त विधान केलं. त्यांनी म्हटलं की, "धर्मांतर करण्यासाठी येणाऱ्या पादरीला ठोकण्यासाठी बक्षीस द्यावं", म्हणजेच पहिल्याला ₹5 लाख, दुसऱ्याला ₹4 लाख, तिसऱ्याला ₹3 लाख, आणि 'पादरीचा सैराट' करणार्याला तर ₹11 लाखांचे बक्षीस द्यावे, अशा शब्दात पडळकरांनी मत व्यक्त केलं होतं. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाज चिडला असून, पुणे, जालना, नाशिक यांसारख्या ठिकाणी निषेध आंदोलनं, मोर्चे, धरणे लावण्यात आली आणि त्यांच्यावर त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली होती.