Mira Bhayandar MNS Morcha : मीरा-भाईंदर मोर्चापूर्वी मनसेचे अविनाश जाधव यांना पहाटेच पोलिसांनी घेतले ताब्यात, पदाधिकाऱ्यांचीही धरपकड

Published : Jul 08, 2025, 09:34 AM IST
MNS Avinash Jadhav

सार

मनसेकडून आज (08 जुलै) सकाळी 10 वाजता मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. तत्पूर्वी पोलिसांकडून पहाटेच मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई : मीरा-भाईंदर शहरात अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आज मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत कडक प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले असून, त्यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. याशिवाय पक्षातील पदाधिकाऱ्यांची देखील धरपकड पोलिसांकडून केली जात आहे. 

पोलिसांनी यापूर्वीच मनसे व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अविनाश जाधव यांनी मराठी जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करत, कोणत्याही दबावास झुकणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे पोलिसांनी पहाटेच त्यांच्यावर कारवाई केली.

दरम्यान, वसई-विरार परिसरातही मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांवर पोलिसांची कारवाई सुरू आहे. त्यामुळे आज सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होणाऱ्या आणि मिरा रोड स्टेशनजवळ संपणाऱ्या मोर्च्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.अविनाश जाधव यांनी आरोप केला की, "पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. मराठी जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. आम्ही आईसाठी म्हणजेच मराठीसाठी कोणताही गुन्हा पत्करायला तयार आहोत."

मोर्चामागील कारण काय? 

मीरा-भाईंदर परिसरात मराठी लोकांवर अन्याय होत असल्याचा आरोप मनसेसह अनेक मराठी संघटनांकडून करण्यात येत आहे. मराठी भाषेला दुय्यम स्थान, मराठी लोकांना घर न देणे, तसेच विशिष्ट समाजाच्या समर्थनार्थ शहरात तेढ निर्माण होणाऱ्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या पार्श्वभूमीवर मराठी अस्मितेसाठी सर्व मराठी समाज एकवटून रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गोवर्धन देशमुख यांचा संताप 

मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख यांनी या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून, "ब्रिटिश सरकार देखील एवढं दडपशाही करत नसेल," अशा शब्दांत त्यांनी सरकारवर आणि पोलीस यंत्रणेवर सडकून टीका केली आहे.

देशमुख म्हणाले, "माझ्या घरीदेखील काल रात्री १ वाजेपर्यंत पोलीस येऊन गेले. शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्व मराठी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. मनसे आणि ठाकरे गटाने लावलेले सर्व फलक पोलिसांनी उतरवले आहेत. काही कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून, अनेकांना घरातून उचलून नेण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे."

“मराठी माणसांनी एकत्र येणं सरकारला नकोय?”

राज्यातील वातावरणावर टीका करत गोवर्धन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना थेट प्रश्न विचारले – “आपण खरोखर मराठी राज्यात आहोत ना? देशाला स्वातंत्र्य मिळालंय ना? मग मराठी माणसे एकत्र येऊ नयेत का?” त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटलं, “मराठी माणूस काही बोलला, तर दडपशाही... पण परप्रांतीय हजारोंच्या संख्येने मोर्चे काढतात, तेव्हा पोलिसांची तत्परता कुठे असते?”

देशमुख यांनी यंत्रणांच्या दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मराठीसाठी कोणी आवाज उठवतो, तर लगेच घरावर पोलीस, नजरकैद, नोटीस. हे काय पारतंत्र्यात जगतोय का आम्ही? आमचं काम खाजगी आहे का? आमचा गुन्हा काय? फक्त मराठी असणं?” असा सवाल त्यांनी केला.

राज्य सरकारवर सडेतोड टीका

“आज मराठी माणसं एकवटणार असल्यानेच तुमचं अंग चुकलंय. हेच तुम्हाला खटकतंय. आम्ही कोणावर अन्याय करत नाही, फक्त आमच्या हक्कासाठी उभं राहत आहोत. मग एवढी दडपशाही का?” असा थेट सवाल करत देशमुखांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती