
वडीगोद्री, जालना: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. "देवेंद्र फडणवीस यांना शेवटचा मोका देतोय. जर मराठा आरक्षणावर अन्याय झाला, तर तुम्हाला रस्त्यावर फिरूही देणार नाही," अशा थेट शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचा बाण सोडला. जरांगे पाटलांनी अंबड तालुक्यातील महाकाळा येथे गोदाकाठच्या १२३ गावांतील मराठा बांधवांची बैठक घेतली आणि २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोठ्या आंदोलनाची तयारी जाहीर केली.
"आता फक्त विजयाचा गुलाल घेऊनच मुंबईतून परतायचं आहे. १२-१३ दिवस मुंबईत राहण्याची तयारी करा. जर एखाद्याला पोलिसांनी काठी मारली किंवा गाडीचं नुकसान झालं, तर महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराचा कार्यक्रम होणार," असा इशारा देत त्यांनी मराठा समाजाला सशक्तपणे मैदानात उतरायला सांगितलं.
मनोज जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं, "माझं शरीर आता साथ देत नाही. पण मी अर्धवट मरणार नाही – मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मरणार नाही. आम्ही कोणाच्या बापाचं आरक्षण घेत नाही, हे आमचं हक्काचं आरक्षण आहे."
"देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळच्या आड ओबीसी आणि मराठा समाजात वाद लावण्याचं काम करत आहेत. अंतरवलीतील हल्ला त्यांनी घडवून आणला. संतोष देशमुख खून प्रकरणात आरोपी वाचवण्यातही त्यांचा हात आहे," असा आरोप जरांगे पाटलांनी केला. तसेच, "कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र व्हॅलिडिटी नाकारण्याचे काम फडणवीस करत आहेत. अधिकाऱ्यांना त्रुटी काढायला सांगत आहेत," असा थेट आरोप करत त्यांनी प्रशासनातील दडपशाहीचं चित्र उभं केलं.
"फडणवीस, तुम्हाला शेवटचा इशारा देतो. माज आणि मस्ती थांबवा. मराठा आरक्षणाबाबत वाईट पावलं उचललीत तर परिणाम गंभीर असतील. दंगल घडवण्याचे तुमचे डाव लोकांच्या लक्षात येत आहेत."
मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठीचा लढा अधिक आक्रमक करण्याचं संकेत दिले आहेत. आता आंदोलन मुंबईच्या दिशेने झेपावणार असून, जरांगे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.