
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा धगधगू लागला असून, आंदोलनाचा उद्रेक आता मुंबईत पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा समाजाचे अग्रणी नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईत थेट आमरण उपोषण करण्याची घोषणा करून, सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे – "आता विजयी यात्रा होईल, नाहीतर अंत्ययात्रा!"
जालन्याच्या अंतरवाली सराटी गावातून त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटलांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढत स्पष्टपणे म्हटले की, "चार मागण्या तात्काळ पूर्ण केली जातील, असे आश्वासन मिळून आज तीन महिने झाले. पण कोणतीच कृती नाही. आता संयम संपत आला आहे."
जरांगे पाटील यांनी समाजाला केलेल्या आवाहनात म्हटले की, “सगळ्यांनी शेतीची कामं जूनमध्ये उरकून टाका. १ ऑगस्ट रोजी आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करू. यावेळी निघालो की थांबायचं नाही.” त्यांनी पुढे म्हटले की, "सोबत येणाऱ्यांनी २० ते २५ दिवसांची तयारी करून यावं. आता केवळ मागण्या करून उपयोग नाही, तर त्यासाठी उठाव करावा लागेल."
मागील उपोषणानंतर सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे जरांगे पाटलांचा संताप उफाळून आला आहे. त्यांनी थेट आरोप केला की, "सरकारने आमची शंभर टक्के फसवणूक केली आहे."
या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारकडून प्रतिक्रिया येणे अद्याप बाकी आहे, मात्र जरांगे पाटलांच्या निर्णायक इशाऱ्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे.