
पुणे: शहरातील चांदणी चौक परिसरात मंगळवारी (29 एप्रिल) दुपारी एक धक्कादायक घटना घडली. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPL) बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात घडला. भरधाव बसने तब्बल पाच ते सहा दुचाकी, एक रिक्षा आणि इतर काही वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्यामुळे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावर असलेल्या वाहनांवर बस घातली. जोरदार धडकेमुळे काही दुचाकीस्वार जमिनीवर फेकले गेले, तर रिक्षाही बाजूला उलटून पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण काय, बसचा ब्रेक खरंच फेल झाला होता का, यासंबंधी अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, घटनास्थळी तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.
या अपघातानंतर पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीएमपीएल बसच्या देखभालीबाबत उदासीनता असल्याचा आरोप यापूर्वीही काही घटनांमुळे झालेला आहे. या अपघातानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित यंत्रणांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.