Manohar Joshi : शिक्षणातील 'सर' ते लोकसभा अध्यक्ष म्हणून 'स्पीकर सर' अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली.
Manohar Joshi : शिक्षणातील 'सर' ते लोकसभा अध्यक्ष म्हणून 'स्पीकर सर' अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विकासाची चौफेर दृष्टी असलेल्या एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही म्हटले आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशामध्ये म्हटले आहे की, "नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राजकारण- समाजकारणात येऊ पाहणाऱ्या पिढ्यांकरिता दीपस्तंभासारखा मार्गदर्शक राहणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे ते सच्चे पाईक होते. ते शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कला-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासंगी होते".
राजकीय तसेच संसदीय लोकशाही प्रणालीवर गाढा विश्वास असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे होते. जेथे-जेथे त्यांनी काम केले. तेथ-तेथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. 'स्वच्छ मुंबई -हरित मुंबई' हा त्यांचा ध्यास होता. त्यावर त्यांनी पुस्तकही लिहिले. त्यांनी अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. राष्ट्रीय विरोधीपक्ष नेता संघाची स्थापना केली होती. जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या स्थापनेमध्ये ते पुढे होते.
महाराष्ट्रासाठी केलेले कार्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे असेही म्हटले की, “महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक यावी याकरिता त्यांनी ॲडव्हान्टेज महाराष्ट्र (Advantage Maharashtra), शेतीतील गुंतवणुकीसाठी ॲग्रो ॲडव्हान्टेज महाराष्ट्र (Agro Advantage Maharashtra) अशा संकल्पनांना मूर्त रूप दिले. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा एक्स्प्रेस - वे म्हणता येईल असा मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग (Mumbai-Pune Expressway) त्यांच्याच काळात साकारला गेला. सिंचनातील कृष्णा खोरे विकास महामंडळाची सुरुवातही त्यांच्याच काळात झाली. टँकरमुक्त महाराष्ट्र (anker free Maharashtra) ही देखील त्यांचीच घोषणा. महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवातही त्यांच्याच पुढाकाराने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण राहिली”.
“तिथेही ते कडक शिस्तीचे 'स्पीकर सर' आणि सर्वपक्षीयांसाठी आदरणीय होते. परखड विचारांचे आणि वाणीचे म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेना पक्षासाठी देखील ही मोठी हानी आहे. आमचे सर्वांचे लाडके आणि मार्गदर्शक सर आपल्यात नाहीत ही कल्पना देखील करवत नाही”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली.
आणखी वाचा
Shri Kalki Dham Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्री कल्कि धाम मंदिराची पायाभरणी PHOTOS