
Manikrao Kokate Resigns : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोट्यातील सदनिका लाटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कोकाटे हे राज्याचे क्रीडामंत्री होते. यापूर्वी कृषीमंत्रीपदावरून त्यांची उचलबांगडी झाली होती आणि आता दुसऱ्यांदा वादात सापडल्याने त्यांना मंत्रिपद गमवावे लागले आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार फारसे इच्छुक नव्हते. उच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत वाट पाहावी, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलंकित नेत्याला मंत्रिमंडळात ठेवण्यास स्पष्ट विरोध केल्याने अखेर कोकाटेंचा राजीनामा स्वीकारण्यात आला, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे मंत्रिमंडळातील एक महत्त्वाची जागा आता रिक्त झाली आहे.
कोकाटेंच्या जागी कोणाची वर्णी लागणार, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. अलीकडेच धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने त्यांच्या पुनरागमनाची चर्चा रंगली होती. मात्र, वाल्मिक कराड प्रकरणाशी संबंधित आरोपांमुळे मुंडेंचे मंत्रिमंडळात पुनरागमन सोपे नाही. तरीही सध्या तेच सर्वाधिक फेव्हरिट मानले जात आहेत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतरच केली जाईल, असे संकेत आहेत. तोपर्यंत क्रीडा व अल्पसंख्याक खाते अजित पवारांकडेच राहणार आहे. मंत्रिपद वाटप करताना अजित पवार जातीय समीकरण साधण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनिल पाटील, संजय बनसोडे यांच्यासह काही नव्या चेहऱ्यांचीही नावे चर्चेत आहेत.
कोकाटेंच्या जागी मराठा समाजातील नव्या चेहऱ्याचा विचार झाल्यास प्रकाश सोळंखे, संग्राम जगताप किंवा सुनील शेळके यांना संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.