
Javali drug case : जावळी तालुक्यातील सावरीत गावातील एका हॉटेलवर टाकण्यात आलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या हॉटेलचा संबंध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्याशी जोडला जात असल्याने प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत थेट एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सुषमा अंधारे यांनी सांगितले की, सावरीत गावातील संबंधित हॉटेल हे प्रकाश शिंदे यांचे असून, त्यांनी ते रणजित शिंदे यांना चालवण्यासाठी दिले आहे. या हॉटेलवर झालेल्या धाडीत अमली पदार्थ सापडणे ही अत्यंत गंभीर बाब असून, याची नैतिक जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर येते, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे शिंदेंनी तात्काळ उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अंधारे यांनी केली.
या प्रकरणात साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी माहिती दडपल्याचा आरोपही अंधारे यांनी केला. पाचगणीसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी अमली पदार्थांचा विळखा पडणे चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. अमली पदार्थांमधून मिळणारा पैसा निवडणुकांसाठी वापरला जात असेल, तर ते लोकशाहीसाठी घातक आहे, असे सांगत त्यांनी पालकमंत्री आणि स्थानिक पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पुण्यातील पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी प्रकाश शिंदे यांच्या भूमिकेला प्रत्युत्तर दिले. प्रकाश शिंदे यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगत मानहानीच्या दाव्याचा इशारा दिला होता. यावर अंधारे म्हणाल्या की, “मी कोणावरही थेट सहभागाचा आरोप केलेला नाही. मात्र सार्वजनिक चर्चेत नाव येत असेल, तर चौकशी झाली पाहिजे. अशा धमक्यांना मी घाबरत नाही.”
दरम्यान, महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी समाजमाध्यमांवर ‘जरा विसावू या वळणावर’ असा संदेश दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणूक न लढवण्याचे संकेत देतानाच हा केवळ स्वल्पविराम असून पूर्णविराम नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजकारण आणि सेवाकार्य सुरूच राहील, असेही त्यांनी नमूद केले.